७० जोडपे अनुदानापासून वंचित
By admin | Published: April 21, 2015 12:31 AM2015-04-21T00:31:05+5:302015-04-21T00:31:05+5:30
पैशांचा अपव्यय व वेळेची बचत करण्यासाठी शासनाने सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न करण्याचे आवाहन केले.
शुभमंगल योजना अपयशी : अनेकांचे विवाह लग्न सोहळ्यात
गोंदिया : पैशांचा अपव्यय व वेळेची बचत करण्यासाठी शासनाने सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न करण्याचे आवाहन केले. या विवाह सोहळ्यात विवाह करणाऱ्या जोडप्यांना १० हजार तर विवाह घडवून आणणाऱ्या संस्थांना प्रत्येक जोडप्यावर दोन हजार रूपये दिले जाते. परंतु गोंदिया जिल्ह्यातील ७० जोडप्यांना अजूनपर्यंत अनुदान देण्यात आले नाही. परिणामी शुभमंगल योजना अपयशी ठरत असल्याचे बोलले जात आहे.
सन २०१३-१४ या वर्षात शुभमंगल योजनेंतर्गत जिल्हयातील सहा संस्थांकडून करण्यात आलेल्या विवाह सोहळ्यातील ८६ जोडप्यांना १० लाख ३२ हजार रूपये अनुदान देण्यात आले. परंतु ७० जोडप्यांना अजूनही कवडीची मदत देण्यात आली नाही. त्यामुळे सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न झालेली जोडपी या अनुदानाच्या प्रतिक्षेत आहेत. लग्न लावून देणाऱ्या संस्था फक्त आपले अनुदान वाढविण्यासाठी वर-वधूंची संख्या वाढवितात. परंतु ते जोडपे निकष पुर्ण करीत नसल्याने अनुदानापासून वंचित राहतात. एकाच वर्षातील एवढे जोडपे अनुदानापासून वंचित आहेत. मागील तीन वर्षाची संख्या पाहता शेकडोंच्या संख्येत जोडपे अनुदानापासून वंचित आहेत. लग्न झालेल्या जोडप्यांंना अनुदान मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांचे लग्न सामूहिक विवाह सोहळ्यात केले जात आहे. मागील तीन ते चार वर्षाच्या तुलनेत हा प्रकार गोंदिया तालुक्यात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न झालेले जोडपे कागदपत्रांचीपुर्तता योग्यरित्या करीत नसल्यामुळे त्यांना अनुदान देण्यात आले नाही.
सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न झालेल्या जोडप्यांना शुभमंगल कन्यादान योजनेचा लाभ मिळत नसल्यामुळे या योजनेकडे नागरिक पाठ फिरवीत आहेत. लोकांनी सामूहिक विवाह सोहळ्यांकडे दुर्लक्ष केल्याचे जाणवते. (तालुका प्रतिनिधी)
संघटनांमध्ये स्पर्धा
आयोजित केलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात जोडप्यांची संख्या अधिक असावी यासाठी सामूहिक विवाह सोहळा घडवून आणणाऱ्या संस्था प्रयत्न करतात. अनेक संस्था लोकप्रतिनिधींच्या हाताशी काम करणाऱ्या लोकांच्या असल्यामुळे किंवा नेत्यांच्याच असल्यामुळे आपल्या संस्थेकडून अधिक जोडप्यांचा विवाह करण्यासाठी चढाओढ लागली आहे. सर्वाधिक जोडप्यांचे लग्न आपण घडवून आणले असा वेगळा बाणा दाखविण्याचा शौक काही संघटनांना आहे. त्यामुळे ते सामूहिक विवाह सोहळ््यात लग्न करण्यास आलेल्या जोडप्यांची शहानिशा न करता त्यांचे लग्न सामूहिक विवाह सोहळ्यात उरकून टाकतात.