जिल्ह्यातील ७० हमाल कामगार संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:24 AM2021-07-11T04:24:16+5:302021-07-11T04:24:16+5:30
वरठी : शासकीय अन्नधान्य गोदामात कार्यरत भंडारा जिल्ह्यातील सहा गोदामातील जवळपास ७० हमाल कामगार संपावर गेले आहेत. अनेक दिवसांपासून ...
वरठी : शासकीय अन्नधान्य गोदामात कार्यरत भंडारा जिल्ह्यातील सहा गोदामातील जवळपास ७० हमाल कामगार संपावर गेले आहेत. अनेक दिवसांपासून कामगाराच्या वाढीव रोजीबाबत मागण्या प्रलंबित असून अत्यावश्यक सेवेत सेवा देऊनही त्यांना लाभ मिळत नसल्याने संपावर गेले आहे. कंत्राटदारांच्या हेकेखोरीमुळे कामगार संपावर गेल्याने स्वस्त धान्य दुकानात धान्य पुरवठा योजना प्रभावित झाली आहे.
भंडारा जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानात पुरवण्यात येणारे धान्य साठवून ठेवण्यासाठी नऊ गोदाम आहेत. यापैकी सहा गोदामात कार्यरत ७० हमाल कामगार दोन दिवसांपासून संपावर आहेत. यात वरठी, खापा, तुमसर, अड्याळ, पवनी व लाखांदूर येथील कामगारांचा समावेश आहे.
माथाडी बोर्डाने २०१८ ला हमाल कामगारांचा दर निर्धारित केले होते. यानुसार त्यांना रोजी मिळणे अपेक्षित आहे. पण गणेश हमाल संस्थेचे कमलकिशोर लाहोटी निर्धारित दरानुसार रोजी देण्यास टाळाटाळ करीत आहेत. याबरोबर त्यांना तीन वर्षांपासून एरियस देण्यात आले नाही. अत्यावश्यक सेवा म्हणून लॉकडाऊन काळात त्यांच्याकडून काम करवून घेण्यात आले. पण या सेवेचा लाभ देण्यात आला नाही. याबाबत माथाडी कामगार कार्यालय व संबंधित विभागाला अनेकदा मागणी करण्यात आली. पण ती पूर्ण न झाल्याने हमाल कामगारांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
संपात वरठी येथील चुनीलाल लारोकर, देवराम हारगुडे, युसुफ शेख, इकबाल शेख, दिलीप मिरासे, प्रभाकर चौधरी, श्रीराम शेळके व नईम शेख सहभाग घेतला आहे.
बॉक्स
स्वस्त धान्य पुरवठा प्रभावित
मोहाडी तालुक्यातील वरठी व खापा येथील गोदामातून १११ स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य पुरवठा होतो. गोदामात येणारे धान्य स्वस्त धान्य दुकानातील वाहनात दुलाईचे काम हमाल कामगार करतात. ते संपावर गेल्याने कोविड काळात वाटप होणारे मोफत धान्य योजना प्रभावित होणार आहे. लवकर तोडगा न निघाल्यास संप लांबण्याची शक्यता आहे.
धान्य दुकानदारांचा पाठिंबा
जिल्ह्यात सुरू असलेल्या हमाल कामगारांच्या संपाला स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने पाठिंबा असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अरविंद कारेमोरे व महासचिव मिलिंद रामटेके यांनी दिली. हमाल कामगारांच्या मागण्या रास्त असून कंत्राटदार गळचेपी करीत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांची मागणी त्वरित मंजूर न झाल्यास स्वस्त धान्य दुकानदार आंदोलनात सहभागी होईल, अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.
100721\img_20210710_153040.jpg
संपावर असलेले हमाल कामगार मागण्यासाठी घोषणा करताना