७०० पेटी ‘मॅगी’ रिटर्न
By admin | Published: June 11, 2015 12:26 AM2015-06-11T00:26:15+5:302015-06-11T00:26:15+5:30
‘मॅगी’मध्ये शरीरास हानीकारक घटक आढळून आल्यामुळे केंद्र व राज्य शासनाने नेस्ले कंपनीची ‘दोन मिनट... वाली मॅगी’वर बंदी...
लाखोंची उलाढाल थांबली
महिन्याकाठी व्हायची १५ लाखांची विक्री
प्रशांत देसाई भंडारा
‘मॅगी’मध्ये शरीरास हानीकारक घटक आढळून आल्यामुळे केंद्र व राज्य शासनाने नेस्ले कंपनीची ‘दोन मिनट... वाली मॅगी’वर बंदी घातली आहे. सरकारच्या बंदीमुळे भंडारा जिल्ह्यात महिन्याकाठी विकली जाणारी सुमारे १५ लाखांच्या मॅगी विक्रीची उलाढाल थांबली आहे. परिणामी, मागील अनेक वर्षांपासून मॅगीचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या ‘गल्ल्यावर’ याचा फटका बसला आहे. बंदीमुळे जिल्ह्यातील मॅगीच्या ७०० पेटी कंपनीकडे परत पाठविण्यात आले आहे.
नेस्ले कंपनीचे उत्पादन असलेल्या मॅगीला घराघरात मोठी मागणी होती. विशेषत: बच्चे कंपनीचे मॅगी हे सर्वाधिक पसंतीचे खाद्यपदार्थ होते. मात्र, मॅगी नूडल्सच्या १३ पैकी १० नमुने तपासणीत शिसे आणि मोनो सोडियम ग्लुटामेटचे (अजिनोमोटो) प्रमाण आढळून आले. हे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक आढळून आल्याने, ते मानवी शरीरास खाण्यायोग्य नसून आरोग्यास हानीकारक घटक असल्याचे समोर आले.यामुळे केंद्र व राज्य शासनाने नेस्लेच्या मॅगी उत्पादनावर विक्रीसाठी बंदी आणली. याची अंमजबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने अन्न व औषधी प्रशासनाला आदेश दिल्यानंतर या विभागाने जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांना सुचना देऊन असलेला स्टॉक जमा करण्याचे निर्देश दिले. याप्रकरणी भंडारा अन्न व औषधी प्रशासनाने येथील मॅगीचे जिल्हा वितरक बृजलाल केसवलाल टेडर्सचे मनोज संघानी यांना सूचना देऊन त्यांच्याकडील साठा कंपनीला परत करण्याचे निर्देश दिले.
भंडारा जिल्ह्यात महिन्याकाठी मॅगीच्या सुमारे एक हजार पेटीची विक्री व्हायची. यातून १५ लाखांची आर्थिक उलाढाल होत होती. मॅगीवरच्या बंदीमुळे आर्थिक व्यवहारावर मोठा परिणाम पडला आहे. दोन दिवसांपासून जिल्ह्यातील किरकोळ दुकानदारांकडे असलेला मॅगीचा साठा परत घेण्यासाठी यंत्रणा गुंतलेली आहे. आतापर्यंत मॅगीच्या ७०० पेटी कंपनीला परत पाठविण्यात आलेल्या आहेत. बाजारात सुमारे ४०० पेटी मॅगी असून ती येत्या दोन दिवसात परत मागवून कंपनीला पाठविण्यात येणार असल्याचे अन्न व औषध विभागाने सांगितले. मॅगी बंदीच्या कारवाईने बच्चे कंपनीची आवडती मॅगी जिल्ह्यातील एकाही दुकानात विकली जात नसल्यामुळे बाजारपेठ ‘मॅगी’विरहीत झालेली आहे.
अन्य उत्पादनावरही परिणाम
नेस्ले कंपनीचे अनेक उत्पादन बाजारात विक्रीसाठी आहेत. मॅगीत शरीरास हानिकारक तत्व आढळल्याने त्याच्या विक्रीवर बंदी घालण्यात आलेली आहे. यामुळे बाजारातून मॅगी हद्दपार झाली आहे. नागरिकांनी याची धास्ती घेऊन नेस्लेचे अन्य उत्पादन खरेदी करण्यास घाबरत आहेत. त्यामुळे नेस्लेच्या अन्य उत्पादनाच्या विक्रीवर मंदीचे सावट ओढवले आहे.
नेस्ले कंपनीच्या उत्पादनांचे मागील ५० वर्षांपासून जिल्ह्यात वितरण करीत आहे. मॅगी विक्रीतून महिन्याला १५ लाखांची उलाढाल व्हायची. बंदीमुळे गल्ल्यावर आर्र्थिक परिणाम झाला आहे. आतापर्यंत मॅगीच्या ७०० पेटी कंपनीला परत पाठविले असून, दोन दिवसात मॅगीच्या ३०० पेटी जमा केले असून आठवडाभरात उर्वरित ४०० पेटी कंपनीला परत पाठविण्यात येईल.
- मनोज संघानी
जिल्हा वितरक, नेस्ले कंपनी, भंडारा.