पोषण आहाराची ७१ पोती तांदूळ जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 11:48 PM2017-12-17T23:48:25+5:302017-12-17T23:48:47+5:30
पहेला येथील गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येत असलेल्या शालेय पोषण आहारांतर्गत तांदळाचे ७१ पोती ट्रकमध्ये भरुन नेत असताना उपसरपंच अनिल गिरडकर, अमोल भुरले, जितू बांते व गावकऱ्यांनी पकडला.
आॅनलाईन लोकमत
पहेला/अड्याळ : पहेला येथील गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येत असलेल्या शालेय पोषण आहारांतर्गत तांदळाचे ७१ पोती ट्रकमध्ये भरुन नेत असताना उपसरपंच अनिल गिरडकर, अमोल भुरले, जितू बांते व गावकऱ्यांनी पकडला. ही घटना रविवारला सकाळी ९ वाजताच्या सुमारास वाजता घडली.
तांदूळ पॉलिश करण्यासाठी नेले जात होते, असे कारण समोर आले असले तरी यामागचे खरे कारण वेगळेच आहे.कोंढा येथील नरेंद्र कावळे यांचा मालकीचा ट्रक क्रमांक एम एच ३१, सीबी ५४१ हा जप्त करण्यात आला. ट्रकवरील चालक मनीराम जोंधरु पदेले रा. कोंढा यांच्या सांगण्यानुसार ट्रकमध्ये एकुण ७१ तांदळाचे पोती भरले असल्याचे सांगितले. शाळेच्या क्रीडा कक्षातून येथील सहायक शिक्षक काटेखाये यांनी खोलीचे कुलूप उघडून दिले असल्याचे ट्रक चालकाने सांगितले. घटनेची माहिती अड्याळ पोलीस ठाणे, तहसीलदार भंडारा. शालेय पोषण आहार जिल्हा अधीक्षक मनिषा गजभिये यांना देण्यात आली.
माहिती मिळताच मनीषा गजभिये यांनी घटनास्थळाला भेट दिली. शाळेतील शिल्लक उर्वरीत धान्याचा पंचनामा केला. त्यात १५ क्विंटल तांदुळ, हळद, मिठ, मसाला मिरची, मुंग व इतर साहित्य मिळाले.
मिळालेल्या साहित्यात बहुतेक साहित्य मुदत गेलेल्या तारखेत आढळला. शालेय पोषण आहाराची जबाबदारी असलेले सहायक शिक्षक काटेखाये यांची विचारपुस केली असता सदर तांदुळ हा पॉलीश करण्याकरिता कोंढा येथे नेण्यात येत असल्याचे सांगितले. पहेला येथे आठ राईसमिल असताना कोंढा येथे का नेत आहेत, या प्रश्नावर ते निरुत्तर झाले.
घटनास्थळी पहेलाचे जिल्हा परिषद सदस्य सुभाष आजबले, पहेला येथील सरपंच सुनिल गेंडे, निमगावचे सरपंच शंकर मडावी, दयानंद नखाते, पहेला येथील तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष विकास भुरले तसेच गावातील शेकडो नागरिक उपस्थित होते. यावेळी गावात चर्चेला उधाण आले होते.
अड्याळ ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल डोंगरे, बोरगावचे बीट जमादार भोंगाडे यांनी पंचनामा करुन ७१ पोती तांदुळ व ट्रक पोलीस ठाण्यात जमा केले. पुढील तपास सुरु आहे.
या प्रकरणाची लवकरच चौकशी करण्यात येईल. यात दोषी आढल्यास कारवाई केली जाईल. हा प्रकार किळसवाना असून नक्की काय झाले हे चौकशीत स्पष्ट होईल.
-मनिषा गजभिये,
शापोआ अधिक्षक, पं.स. भंडारा
ट्रकमध्ये असलेले तांदुळ पॉलीश करण्यासाठी नेले जात होते. अफरातफरीचा प्रश्नच येत नाही.
- नरेंद्र कावळे,
संस्था सहसचिव, कोंढा.
शालेय पोषण पळवापळवी करण्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात यावी.
- सुनिल शेंडे,
सरपंच, पहेला.
चौकशीअंती अहवाल प्राप्त झाल्यानंतर तक्रार नोंदविल्यास पुढील कायदेशिर कारवाईची प्रक्रिया करण्यात येईल.
- एम. सी. डोंगरे,
पोलीस उपनिरिक्षक, अड्याळ