पुरामुळे भंडारा जिल्ह्यातील महामार्गासह ७२ ग्रामीण मार्ग बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 03:15 PM2022-08-10T15:15:52+5:302022-08-10T15:16:03+5:30
२२ मंडळांत अतिवृष्टी : अनेक घरांची पडझड
भंडारा : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने नदी-नाल्यांना आलेल्या पुराने मनसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गासह जिल्ह्यातील ७२ मार्ग बुधवारी सकाळपासून बंद पडले. गत २४ तासांत जिल्ह्यात ९४.०९ मिमी पाऊस कोसळला असून २२ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. शेकडो घरात पाणी शिरले असून अनेक घरांची पडझड झाली आहे. प्रशासनाच्यावतीने पंचनामे करण्यात येत आहे.
भंडारा जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. मंगळवारी जिल्ह्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. दिवसभर विश्रांतीनंतर मंगळवारी रात्री जिल्ह्यात सर्वदूर पाऊस कोसळला. २४ तासांत ९४.०९ मिमी पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक १९० मिमी पाऊस तुमसर तालुक्यात कोसळला. या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. मनसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर तुमसर तालुक्यात नाल्याच्या पुरामुळे हा महामार्ग सकाळपासून ठप्प झाला आहे. यासोबतच मोहाडी ते बालाघाट हा राज्य महामार्गही बंद आहे. जिल्ह्यातील तब्ब्ल ७२ ग्रामीण मार्ग बुधवारी सकाळपासून बंद झाले आहे.
मोहाडी शहराजवळील नाल्याला आलेल्या पुराने मोहाडी ते तुमसर हा रस्ता बंद पडला असून मोहाडी येथील १७ कुटुंबांना जिल्हा परिषदेच्या शाळेत हलविण्यात आले आहे. भंडारा शहरातील सखल भागातील अनेक घरात पाणी शिरले असून जिल्ह्यातील नदी-नाल्याकाठावरील गावांमध्येही पुराचे पाणी शिरले आहेत. अनेक घरांची पडझड झाली आहे. प्रशासनाच्यावतीने घराचे पंचनामे करण्यात येत आहे. त्यानंतरच नेमके किती नुकसान झाले याची माहिती कळणार आहे.
गोसे प्रकल्पाचे ३३ दरवाजे उघडले
गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या पानलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे पाणी पातळी नियंत्रणासाठी या प्रकल्पाचे सर्व ३३ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहे. या प्रकल्पातून ६७७८.२७ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केला जात आहे. पाणीपातळी वाढल्यास १२ हजार ते १६ हजार क्युसेक्सपर्यंत पाणीपातळी टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येणार आहे. नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.