उज्ज्वलाचे ७२ हजार लाभार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 10:07 PM2018-12-28T22:07:14+5:302018-12-28T22:07:29+5:30
प्राकृतिक पेट्रोलियम व गॅस मंत्रालयाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचे भंडारा जिल्ह्यात ७२ हजार ५१३ गॅस जोडणी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या योजनेत ज्यांना लाभ मिळाला नाही त्यांनाही याचा लाभ देण्यात येईल, अशी माहिती नोडल अधिकारी आकांक्षा वाघमारे यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : प्राकृतिक पेट्रोलियम व गॅस मंत्रालयाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचे भंडारा जिल्ह्यात ७२ हजार ५१३ गॅस जोडणी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या योजनेत ज्यांना लाभ मिळाला नाही त्यांनाही याचा लाभ देण्यात येईल, अशी माहिती नोडल अधिकारी आकांक्षा वाघमारे यांनी दिली.
शुक्रवारी दुपारी १ वाजता विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी कोचे गॅस एजन्सीचे संचालक डी.एफ. कोचे उपस्थित होते. वाघमारे यांनी सांगितले की, सदर योजनेंतर्गत केंद्र शासनाने १२ हजार ८०० कोटी रूपयांची अर्थसंकल्पात तरतूद केली होती. यात पाच कोटी ग्राहकांना गॅस जोडणी देण्याचे उद्दीष्ट होते ते पूर्ण करण्यात आले आहेत. भंडारा जिल्ह्यात इंडियन आॅईल कार्पाेरेशनचे २७ हजार ३४६, भारत पेट्रोलियम कार्पाेरेशनतर्फे ९ हजार ९०७ तर हिंदुस्तान पेट्रोलियन कार्पाेरेशनकडून ३५ हजार २६० असे एकूण ७२ हजार ५१३ गॅस जोडणी देण्यात आली आहे. या योजनेपैकी ९२ टक्के लाभार्थी स्वत:हून गॅस रिफिल करीत आहे. यात येणाºया समस्यांवरही उपाययोजना केल्या जात असल्याचीही वाघमारे यांनी स्पष्ट केले आहे.