७३८ कोटींच्या भंडारा शहराच्या बायपास महामार्गाला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 11:49 AM2020-06-17T11:49:42+5:302020-06-17T11:51:34+5:30

भंडारा बायपास रस्ता १४.८ किमी सहा पदरीकरणाचा राहणार आहे. या रस्त्यावर उड्डाणपूल, ४ मोठे पूल, २ लहान पूल, २ वाहन भूमिगत रस्ते, ६ लहान वाहन भूमिगत रस्ते, १५ लहानमोठे पूल, १७ किमीचा सर्व्हिस रोड, ११ लहान जंक्शन, रस्त्याच्या दोन्ही बाजुला ४ बस थांबे राहणार आहेत.

738 crore approved for Bhandara city bypass highway | ७३८ कोटींच्या भंडारा शहराच्या बायपास महामार्गाला मंजुरी

७३८ कोटींच्या भंडारा शहराच्या बायपास महामार्गाला मंजुरी

googlenewsNext
ठळक मुद्देजमीन संपादनाची प्रक्रिया सुरू१४ किमीचा रस्ता

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी बायपास मार्गाला मंजुरी मिळाली असून हा बायपास १४ किमी. सहा पदरी राहणार आहे. रस्त्याचे बांधकाम, भुसंपादन व अन्य कामांसाठी ७३८ कोटी ६७ लाख रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे.
मुंबई ते कोलकता हा राष्ट्रीय महामार्ग भंडारा शहरातून जात असल्याने सर्व जड व प्रवासी वाहतूक याच मार्गावरून होते. जिल्हा परिषद, जिल्हा न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारतीतील अनेक कार्यालये याच मार्गावर आहेत. त्यावरून भरधाव जाणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. नागपूरहून निघालेला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ (जुना क्र.६) चार पदरी असला तरी मुजबी ते पलाडीपर्यंतचा रस्ता दोन पदरी असल्यामुळे शहरवासियांना त्याचा काहीच फायदा होत नव्हता. उलट अपघातात वाढ झाली होती. या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षापासून होती.
आता बायपासला मंजुरी मिळाली असून बांधकामाबाबत प्रकल्पाची सर्व तांत्रिक कामे पूर्ण झाली आहेत. प्रस्तावित मार्ग शहापूर, बेला वरून वळण घेऊन तीर्थक्षेत्र कोरंभी येथे वैनगंगा नदीवर दोन नवीन पूल बांधण्यात येणार आहे. सदर रस्ता गिरोला, भिलेवाडा मार्गाहून चारपदरी रस्त्याला येऊन मिळणार आहे. जमीन संपादनासाठी भारत सरकार तर्फे राजपत्र प्रकाशित करण्यात आले आहे. या बायपास रस्त्याचे काम पूर्ण होताच सर्व प्रवासी व माल वाहतूक येथून वळवली जाईल.
या बायपास रस्त्याची लांबी १४ किलोमीटर असणार आहे. यासाठी ५६.८९ हे.आर. जमिन १३ गावांमधून संपादीत करायची आहे. आजीमाबाद, बेला, भिलेवाडा, दवडीपार, दिघोरी, गिरोला, हंसापूर, खापा, कोरंभी, पलाडी, सालेबर्डी, सिरसघाट, उमरी येथील जमिनीचे संपादनाचे काम सुरू झाले आहे. या रस्त्याच्या प्रत्यक्ष बांधकामाचा खर्च ६१८.७५ कोटी रुपये असून भुसंपादन व युटीलीटी शिफ्टिींगसह ७३८ कोटी ६७ लाख रुपयांचा खर्च यावर होणार आहे.

रस्ता सहापदरीकरण
भंडारा बायपास रस्ता १४.८ किमी सहा पदरीकरणाचा राहणार आहे. या रस्त्यावर उड्डाणपूल, ४ मोठे पूल, २ लहान पूल, २ वाहन भूमिगत रस्ते, ६ लहान वाहन भूमिगत रस्ते, १५ लहानमोठे पूल, १७ किमीचा सर्व्हिस रोड, ११ लहान जंक्शन, रस्त्याच्या दोन्ही बाजुला ४ बस थांबे राहणार आहेत.

सदर बायपास रस्त्यामुळे नागरिकांना जड वाहतुकीची समस्या राहणार नाही. अपघाताचे प्रमाण कमी होईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्याने अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बायपास रस्त्याची मागणी पूर्ण होणार आहे.
-सुनील मेंढे,
खासदार, भंडारा-गोंदिया.

Web Title: 738 crore approved for Bhandara city bypass highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.