पाणीपुरी खाल्याने ७५ जणांना विषबाधा, एका बालिकेचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 03:17 PM2021-03-16T15:17:20+5:302021-03-16T15:18:12+5:30
एका बालिकेचा मृत्यू : पवनी तालुक्यातील भेंडाळाची घटना
भंडारा : आठवडी बाजारात पाणीपुरी खाल्याने तब्बल ७५ जणांना विषबाधा हाेवून एका बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना पवनी तालुक्यातील भेंडाळा येथे मंगळवारी घडली. आराेग्य विभागाने गावात धाव घेऊन तात्काळ शिबीर लावले आहे ज्ञानेश्वरी रामदास सतीबावने (११) रा. भेंडाळा असे मृत बालिकेचे नाव आहे. भेंडाळा येथे रविवारी आठवडी बाजार हाेता. या आठवडीबाजारात अनेकांनी पाणीपुरी खाल्ली. साेमवारी दुपारपासून अनेकांना उलटी आणि मळमळचा त्रास व्हायला लागला. याबाबतची माहिती आराेग्य विभागाला देण्यात आली. दरम्यान मंगळवारी तब्बल ७५ जणांना त्रास जाणवायला लागला.
जिल्हा आराेग्य विभागाने भेंडाळा ग्रामपंचायत कार्यालयात शिबीर लावून उपचार सुरु केले आहेत. आतापर्यंत ७५ जणांवर उपचार करण्यात आल्याची माहिती जिल्हा आराेग्य अधिकारी डाॅ. प्रशांत उईके यांनी दिली. दरम्यान मंगळवारी सकाळी ९ वाजता ज्ञानेश्वरी सतीबावने या बालिकेचा मृत्यू झाला. ती पाचव्या वर्गाची विद्यार्थीनी हाेती. जिल्हाधिकारी संदीप कदम, उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकाऱ्यांनी भेंडाळा येथे धाव घेतली. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात आले.
पवनी तालुक्यातील भेंडाळा येथील घटनेतील व्यक्तींची प्रकृती स्थिर असून आरोग्य विभाग याबाबतची काळजी घेत आहे. आरोग्य विभागाने या ठिकाणी तातडीने आरोग्य तपासणी शिबिर सुरू केले आहे. पाणी पुरी खाल्ल्याने विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज असून जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. फारुकी व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके यांनी भेंडाळा येथे भेट देऊन घटनेची माहिती घेतली. पाणी पुरी स्टॉलचे नमुने घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.