७५ हजार विद्यार्थी पहिल्या दिवशी शाळेला मुकणार
By admin | Published: June 18, 2017 12:23 AM2017-06-18T00:23:50+5:302017-06-18T00:23:50+5:30
जिल्हा परिषद शिक्षकांच्या विविध मागण्या प्रशासनाकडे प्रलंबित आहेत. त्या सोडविण्याऐवजी त्यांना केवळ आश्वासन देण्यात येत आहे.
शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या : शिक्षक कृती समितीने घेतला निर्णय, प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांच्या नजरा
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्हा परिषद शिक्षकांच्या विविध मागण्या प्रशासनाकडे प्रलंबित आहेत. त्या सोडविण्याऐवजी त्यांना केवळ आश्वासन देण्यात येत आहे. त्यामुळे या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत शाळा उघडायची नाही, असा निर्णय शिक्षक कृती समितीने शनिवारला घेतला. यामुळे जिल्ह्यातील सुमारे ७५ हजार २८७ विद्यार्थी शाळेच्या पहिल्या दिवसाला मुकणार आहेत.
जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिकच्या इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतच्या सुमारे ७४० शाळा जिल्ह्यात आहेत. या शाळांमधून ७५ हजार २८७ विद्यार्थी विद्यार्जन घेत आहेत. या विद्यार्थ्यांना सुमारे तीन हजार ५०० शिक्षक विद्यार्जनाचे धडे गिरवित आहेत. मात्र विद्यार्थी घडविणाऱ्या शिक्षकांवर जिल्हा परिषद प्रशासनाकडून मागील वर्षभरापासून अन्याय होत असल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे. शिक्षकांच्या अनेक समस्या मार्गी लावण्या ऐवजी त्यांना केवळ आश्वासन देवून वेळ मारून नेत आहे. अनेकदा चर्चा, आंदोलने, निवेदने जिल्हा परिषद प्रशासनाला देण्यात आले. मात्र प्रशासनाने यावर तोडगा काढण्याऐवजी "वेळकाढू" धोरण अवलंबिले आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष पसरला आहे. दरम्यान ६ आॅक्टोबरला जिल्ह्यातील सर्व जि.प. शाळांमध्ये शिक्षकांनी जि.प. समोर महाधरणे आंदोलन केले होते. या आंदोलनातून शिक्षकांनी असंतोष व्यक्त केला होता. त्यावेळी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, खासदार नाना पटोले, आमदार चरण वाघमारे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेवून मागण्या आठवडा भरात निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र माशी कुठे शिंकली कुणास ठावूक, शिक्षकांच्या मागण्या अद्यापही प्रलंबित आहेत.
त्यामुळे शिक्षकांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे. या २७ जूनला जि.प. च्या सर्व शाळा सुरू होत आहेत. मात्र शिक्षकांच्या समस्या निकाली निघेपर्यंत शाळा उघडायच्या नाही, असा ठोस निर्णय शिक्षक कृती समितीने आज झालेल्या बैठकीत घेतला आहे.
या निर्णयाचे निवेदन शिक्षक कृती समितीने जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोकर, उपाध्यक्ष राजेश डोंगरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) मनिषा ठवकर यांना दिले आहे. शिष्टमंडळात कृती समितीचे रमेश सिंगनजुडे, धनंजय बिरणवार, ईश्वर नाकाडे, केशव बुरडे, महेश गावंडे, प्रमोद घमे, संदीप वडीले, किशोर ईश्वरकर, हरिकिसन अंबादे, रमेश पारधीकर, मुकूंद ठवकर आदींचा समावेश होता.