नागझिरा अभयारण्यात ७५ वर्षीय ‘रूपा’चे राज
By admin | Published: September 21, 2015 12:25 AM2015-09-21T00:25:20+5:302015-09-21T00:25:20+5:30
नागझिरा अभयारण्यात पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र उरलेली ७५ वर्षीय ‘रूपा’ या जंगलावर अनेक वर्षापासून राज करीत आहे .
गरज काळजी घेण्याची : जिल्ह्यात हत्तींची संख्या कमीच
साकोली : नागझिरा अभयारण्यात पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र उरलेली ७५ वर्षीय ‘रूपा’ या जंगलावर अनेक वर्षापासून राज करीत आहे .
१९६७-६८ मध्ये आसाम राज्यातून नवेगावबांध येथे चार हत्ती आणण्यात आले. या चार हत्तींमध्ये हरेलगज (नर), मावी (मादी), मुक्तमाला (मादी) आणि रूपा (मादी) यांचा समावेश होता. या हत्तींकडून नवेगावबांध येथे जंगलातील लाकडे गोळा करणे, साग, साजा, बिजा यांचा लाट करणे, रस्त्यावर पडलेली झाडे बाजूला करणे इत्यादी अनेक कामे त्यांच्याकडून केल्या जात. त्यावेळी ‘रूपा हत्तीणीचे’ वय २५ वर्षाचे होते. व्ही. अप्पू पन्नीकर हा केरळचा रहिवासी असून तो रूपाचा माहूत होता. धर्मा सोनूजी धुर्वे हा मदतनीस होता. नवेगावची कामे आटोपल्यानंतर तिला आलापल्ली येथे नेण्यात आले. तिच्या सोबतीला अमरावतीवरून ‘गजराज’ या हत्तीला आणण्यात आले. आलापल्ली येथे पूर्वीच पाच हत्ती होते. सरदार (नर) जगदिश (नर), आवेशा (मादी), श्रीलंका (मादी) आणि कमला अशी त्यांची नावे होती.
या पाच हत्तींनी रूपा आणि गजराजला आपल्यात मिसळू दिले नाही. त्यामुळे त्यांचे कार्यक्षेत्र वेगळे करण्यात आले. काम आटोपल्यानंतर ‘रूपाची’ पुन्हा नवेगाव येथे बदली करण्यात आली. नंतर भंडारा डेपो व त्यानंतर पेंच जलाशय येथे बदली करण्यात आली. रूपाचे वेळोवेळी होणारे स्थानांतरण तिला त्रासदायक झाले असे नागझिरा, नवीन नागझिरा, कोका आणि नवेगाव या जंगलव्याप्त भागावर अभ्यास करणारे विनोद भोवते म्हणाले. मुक्तमाला व मावी या हत्तीणीचे नवेगाव येथे निधन झाले. १९७९ च्या काळात रुपावर अंबारी कसून पर्यटकांना व्याघ्रदर्शनाची संधी मिळे. मात्र याच काळात रूपाची काळजी घेणारे व्ही अप्पू पन्नीकर यांना लकवा मारल्याने काही दिवसातच त्यांचा मृत्यू झाला आणि धर्मा सोनू धुर्वे हे रूपाचे माहुत झाले. (शहर प्रतिनिधी)
तीन दिवस पाण्यात : रूपाचा पुनर्जन्म
२५ वर्षापूर्वी रूपा नागझिऱ्यातील तलावात तीन दिवस सतत बुडून राहिली. तिचे सोंड मात्र पाण्याबाहेर श्वास घेत होते. रुपा दगावणार या भीतीने वन्यजीव विभाग हादरून गेला. शेवटी आपल्या प्राणाची पर्वा न करता माहुताने तळ्यातील लटकलेला लोखंडी सगर बुडी मारून सोडवला व तिचे प्राण वाचले.
सेवानिवृत्त रूपा
अभयारण्यातील रूपा ही सेवानिवृत्त झाली असून तिला दररोज ३ वाजता १० किलो गव्हाचे पाणगे, १ किलो गूळ, १०० ग्रॅम तेल, २५० ग्रॅम मीठ पुरवल्या जाते. पोटाची खळगी भरावी म्हणून रूपा वड, पिंपळ, उंबर, बांबू, वृक्षांची साल, गवतही खाते. क्षारांची कमतरता भासल्यास ती स्वत: खरमत मातीचा आस्वाद घेते. ३१ आॅगस्ट २००७ ला रुपाचे माहूत धर्मा सोनू धुर्वे सेवानिवृत्त झाले आणि आता मनोहर महागू टेकामकडे रूपाचा सांभाळ करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. आणखी वन्यजीव विभागाने तिची अशीच काळजी घेतली तर ती आपले शतक पूर्ण करेल.