७६ टक्के रोपवाटिका तयार
By admin | Published: July 2, 2015 12:48 AM2015-07-02T00:48:38+5:302015-07-02T00:48:38+5:30
मागील काही दिवसांपासून पाऊस पडत नाही. पडलेच तर अत्यल्प प्रमाणात, तेही कुठे पाऊस तर कुठे नाही.
ओलावा कायम : मात्र पावसासाठी नजरा आकाशाकडे
गोंदिया : मागील काही दिवसांपासून पाऊस पडत नाही. पडलेच तर अत्यल्प प्रमाणात, तेही कुठे पाऊस तर कुठे नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा सद्यस्थितीत आकाशाकडे आहेत. असे असतानाही जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी एकूण १३ हजार ०३५ हेक्टर जमिनीत रोपवाटिका लावण्याचे कार्य पूर्ण केले आहे. मात्र १० दिवसात पाऊस न पडल्यास रोपवाटिकेला नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मागील दोन वर्षांपासून सतत दुष्काळाचे चटके शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे. खरीप हंगामात अधिक उत्पन्न घेवून कर्जमुक्त होवू, असे त्यांना वाटते. मात्र आता पाऊस दडी मारल्यासारखा दिसत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तरी सहा-सात दिवस जरी पाऊन आले नाही तरी जमिनील ओलाव्यामुळे रोपवाटिकेवर विपरित परिणाम होणार नाही, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.
जिल्ह्यात भात पिकाच्या रोपवाटिकेचे क्षेत्र १७ हजार हेक्टरच्या वर असून सध्या १३ हजार ०३५ हेक्टरमध्ये रोपवाटिका लावण्याचे कार्य पूर्ण झाले आहे. गोंदिया तालुक्यात २ हजार १५८ हेक्टर, तिरोडा तालुक्यात दोन हजार २५० हेक्टर, गोरेगाव तालुक्यात एक हजार ३४८ हेक्टर, आमगाव तालुक्यात एक हजार ७०० हेक्टर, सालेकसा तालुक्यात एक हजार ७५ हेक्टर, देवरी तालुक्यात १ हजार ३२७ हेक्टर, सडक-अर्जुनी तालुक्यात १ हजार ७१५ हेक्टर व अर्जुनी-मोरगाव तालुक्यात एक हजार ७१५ हेक्टर क्षेत्रात रोपवाटिका लावण्यात आल्या आहेत.
कृषी विभागाच्या नोंदीनुसार जून महिन्यात ११२ टक्के पाऊस पडले आहे. २५, २६ व २९ जून रोजी सर्वच तालुक्यात पाऊस पडले आहे. त्यामुळे जमिनीत ओलावा असून रोपवाटिका सद्या वाळण्याची शक्यता नाही, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
संकरित तूर बियाणे मोफत वितरित
शासनाने कृषी विभागामार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी २५ क्विंटल आयसीपीएच २७४० नावाचे संकरित तूर बियाणे शेतकऱ्यांसाठी मोफत उपलब्ध करून दिले आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून जिल्ह्यातील पाच हजार शेतकरी लाभार्थ्यांना हे बियाणे मोफत वितरित केले जात असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. यात गोंदिया तालुक्यातील ७०० शेतकऱ्यांना ३.३ क्विंटल, गोरेगाव तालुक्यातील ७०० शेतकऱ्यांना ३.५ क्विंटल, तिरोडा तालुक्यातील ७०० शेतकऱ्यांना ३.५ क्विंटल, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ७०० शेतकऱ्यांना ३.५ क्विंटल व देवरी तालुक्यातील ७०० शेतकऱ्यांना ३.५ क्विंटल वाटप करणे सुरू आहे. तसेच आमगाव, सालेकसा व सडक-अर्जुनी या तिन्ही तालुक्यातील प्रत्येकी ७०० शेतकऱ्यांना २.५ क्विंटल सदर तूर बियाणे मोफत वाटप केले जात आहे.