साकोलीत पावणेआठ लाखांची धाडसी चोरी, रोख रकमेसह ऐवज लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 02:48 PM2023-08-25T14:48:16+5:302023-08-25T14:49:57+5:30
एकापेक्षा जास्त चोरट्यांचा समावेश
इंद्रपाल कटकवार
भंडारा : जिल्ह्यात चोरीच्या घटना सातत्याने वाढत असताना साकोली शहरात चोरट्यांनी पुन्हा एका घरात धाडसी चोरी केली आहे. यात चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या ऐवजासह रोख रक्कम चोरून नेली. तब्बल सात लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. धर्मेंद्र सत्यनारायण अग्रवाल (४६)रा. नर्सरी कॉलनी साकोली यांच्या तक्रारीवरून साकोली पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. ही घटना गुरुवारला उघडकीस आली.
माहितीनुसार, धर्मेंद्र अग्रवाल हे कुटुंबीयांसह कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. यावेळी घरासमोरील दाराला कुलूप लावले होते. चोरट्यांनी घर बंद असल्याची संधी साधून अग्रवाल यांच्या घरासमोरील प्रवेशद्वाराचा कुलूप फोडला. आत प्रवेश केला. लोखंडी अलमारातील सोन्याचे गोप तीन नग, एक डायमंड सेट व रोख ७० हजार रुपये सह सोन्याच्या अंगठ्या बांगड्या व टॉप्स असा एकूण सात लाख ७० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
अग्रवाल यांच्या तक्रारीवरून साकोली पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध ४५४, ४५७, ३८० कलमांवर गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक संजय खोकले करीत आहेत. शहरात चोरीच्या घटना सातत्याने वाढत असल्याचेही दिसून येत आहे. चोरीच्या या घटनेत एकापेक्षा जास्त चोरटे सहभागी झाले असावेत असा पोलिसांचा कयास आहे. त्या दृष्टीनेही तपास सुरू आहे. दरम्यान धाडसी घरफोडीच्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून गस्त वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे.