८०९ गावांना टंचाईसदृश परिस्थितीतून वगळले
By admin | Published: November 19, 2015 12:17 AM2015-11-19T00:17:15+5:302015-11-19T00:17:15+5:30
धानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात किडींचा प्रादुर्भाव आणि निसर्गाच्या प्रकोपामुळे धान उत्पादनात कमालिची घट झाली.
खरीप पीक सुधारित पैसेवारी : ३७ गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी
लोकमत विशेष
देवानंद नंदेश्वर भंडारा
धानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात किडींचा प्रादुर्भाव आणि निसर्गाच्या प्रकोपामुळे धान उत्पादनात कमालिची घट झाली. यानंतरही जिल्हा प्रशासनाने खरीप पिकांची सुधारीत पैसेवारी ६२ पैसे घोषित केली आहे. यात ३७ गावांची ५० पैसेपेक्षा कमी तर ८०९ गावांची ५० पैसेपेक्षा अधिक पैसेवारी दाखविण्यात आली आहे. ८०९ गावातील शेतकऱ्यांना टंचाईसदृश्य परिस्थितीतून वगळण्यात आल्याने आता शेतकऱ्यांचे लक्ष अंतिम पैसेवारीकडे लागले आहे.
भंडारा जिल्ह्यात १ लाख ९७ हजार ६३ हेक्टर क्षेत्रात खरीप पिकाची लागवड करण्यात आली. त्याची टक्केवारी ९८.७५ टक्के एवढी आहे. धानपिकाची ९७.६९ टक्के म्हणजेच १ लक्ष ७७ हजार ८६६ हेक्टरमध्ये लागवड करण्यात आली. खरीप हंगामात धानाचे उत्पादन कमालिचे घटल्याने शेतकऱ्यांवर बिकट परीस्थिती ओढावली आहे. कर्जाची परतफेड कशी करायची, असा प्रश्न त्यांना पडला आहे. महसूल विभागाने घोषित केलेल्या अंतिम पैसेवारीत ८०९ गावातील पीक स्थिती उत्तम दाखवून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे.
जिल्हा प्रशासनाने ८४६ गावांची अंतिम पैसेवारी ६२ पैसे दर्शविली आहे. यातील ३७ गावे ५० पैसेपेक्षा कमी तर ८०९ गावात ५० पैसेपेक्षा जास्त पैसेवारी दाखविण्यात आली आहे. याविषयी शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
भंडारा तालुक्यातील १६९ गावांची पैसेवारी ६८ पैसे, मोहाडी तालुक्यातील १०८ गावांची पैसेवारी ६२ पैसे, तुमसर तालुक्यातील १४३ गावांची पैसेवारी ६४ पैसे, पवनी तालुक्यातील १४१ गावांची पैसेवारी ६६ पैसे, साकोली तालुक्यातील ९४ गावांची पैसेवारी ५७ पैसे, लाखांदूर तालुक्यातील ८९ गावांची पैसेवारी ५८ पैसे आणि लाखनी तालुक्यातील १०२ गावांची पैसेवारी ५९ पैसे दाखविण्यात आली आहे. लाखनी तालुक्यातील १०२ गावांपैकी ३७ गावे ५० पैसेपेक्षा कमी, तर ६५ गावे ५० पैसेपेक्षा जास्त पैसेवारी दाखविण्यात आली आहे.
४३ गावे पैसेवारीतून बाद
भंडारा जिल्ह्यात एकूण ८८९ गावे आहेत. यात ८७५ गावे खरीप तर १४ गावे रब्बीची आहेत. २९ गावांत खरीप पिकाची लागवड करण्यात आली नाही. यात भंडारा तालुक्यातील १६, पवनी २, तुमसर ७, साकोली व लाखनी तालुक्यातील दोन गावांचा समावेश आहे. २९ गावे पिके नसलेली आहेत.
पवनी तालुक्यातील १४ गावे रबी पिकाची आहेत. त्यामुळे त्या ४३ गावांची पैसेवारी जाहीर करण्यात आली नाही. जिल्ह्यातील ८८९ एकूण गावांपैकी ८४६ गावांमध्ये खरीप पिकांची लागवड करण्यात आली. ८४६ गावांच्या खरीप पिकांची पैसेवारी जाहीर करण्यात आली. यात ८०९ गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा जास्त दाखविण्यात आली. यावर्षी जिल्हा प्रशासनाने धान उत्पादक शेतकरी संकटात असतानाही सुधारित पैसेवारी ६२ पैसे दाखवून शेतकऱ्यांवर अन्याय केल्याचा आरोप होत आहे़
पैसेवारीत तीनदा बदल
शासनाचे १६ सप्टेंबरच्या आदेशान्वये ६७ पैशांपेक्षा कमी-अधिक पैसेवारीच्या निकषानुसार जिल्ह्यात ७४ पैसे ही पैसेवारी १८ सप्टेंबरला घोषित केली. शासनाने २३ सप्टेंबरला पैसेवारीचे सुधारित निकष मागे घेऊन प्रचलित ५० पैशांपेक्षा कमी-अधिक प्रमाणात पैसेवारी घोषित करण्याच्या शासन निर्णय घेण्यात आला. त्यानुसार जिल्ह्याची सुधारित नजर अंदाज पैसेवारी ७३ पैसे घोषित केली. राज्य शासनाने प्रचलित सुधारीत पैसेवारी १५ नोव्हेंबरला करण्याचे ठरविले होते. मात्र शासनाने ३ नोव्हेबर रोजी शासन निर्णय काढून सुधारित पैसेवारी ३१ आॅक्टोंबरला घोषित करण्याचा आदेश दिले. त्यामुळे जिल्हा प्रशासनात एकच संभ्रम निर्माण झाला. अखेर जिल्हा प्रशासनाने ७ नोव्हेबर रोजी सुधारीत पैसेवारी ६२ पैसे घोषित केली.