१९ केंद्रांवर ८ हजार परीक्षार्थी देणार आज टीईटी परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2021 05:00 AM2021-11-21T05:00:00+5:302021-11-21T05:00:52+5:30
टीईटी परीक्षेसाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली असून भंडारा शहरात दोन सत्रात ही परीक्षा घेतली जाईल. पहिला पेपर सकाळी १०.३० ते दुपारी १ पर्यंत आणि दुसरा पेपर दुपारी २ ते ४.३० या वेळात होणार आहे. पहिल्या पेपरसाठी १९ परीक्षा केंद्रावर ४६४६ परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. तर दुसऱ्या पेपरसाठी ३५३० परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. या परीक्षेसाठी जय्यत तयारी शिक्षण विभागाने केली आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने रविवारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) जिल्ह्यातील १९ परीक्षा केंद्रावर घेतली जाणार आहे. पहिला आणि दुसरा पेपर एकूण ८ हजार १७६ विद्यार्थी देणार आहे. जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग या परीक्षेचे नियंत्रण करीत असून कर्मचारी व परीक्षार्थ्यांना कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
टीईटी परीक्षेसाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली असून भंडारा शहरात दोन सत्रात ही परीक्षा घेतली जाईल. पहिला पेपर सकाळी १०.३० ते दुपारी १ पर्यंत आणि दुसरा पेपर दुपारी २ ते ४.३० या वेळात होणार आहे. पहिल्या पेपरसाठी १९ परीक्षा केंद्रावर ४६४६ परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. तर दुसऱ्या पेपरसाठी ३५३० परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. या परीक्षेसाठी जय्यत तयारी शिक्षण विभागाने केली आहे.
सरकारी किंवा अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांची मिळवायची असेल तर टीईटी परीक्षा पास होणे गरजेचे आहे. तसेच जे शिक्षक नोकरी करतात त्यांनाही टीईटी पास होणे गरजेचे आहे. आधीच्या नियमानुसार सात वर्षाच्या आतच तो उमेदवार शिक्षकाच्या नोकरीसाठी अर्ज करु शकत होता. ती मुदत संपल्यावर पुन्हा टीईटी परीक्षा देणे बंधनकारक होते. आता हे टेंशन मात्र मिटले आहे.
आता एकदा परीक्षा पास झाली की आजीवन वैधता राहणार असल्याने शिक्षक होणाऱ्या उमेदवारांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक विद्यार्थी शिक्षक होण्याचे स्वप्न पाहत असतात. मात्र वशिलेबाजीमुळे अनेकांचे शिक्षक होण्याचे स्वप्न अपूर्ण राहत होते. आता या परीक्षेमुळे इच्छुकांचे शिक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण होईल.
असे आहेत भंडारा शहरातील परीक्षा केंद्र
- टीईटीच्या पहिल्या पेपरसाठी भंडारा येथील बन्सीलाल लाहोटी नूतन महाराष्ट्र विद्यालय, सनी स्प्रिंगडेल स्कूल, आरएम पटेल महाविद्यालय, नगर परिषद गांधी विद्यालय, संत शिवराम विद्यालय, महिला समाज विद्यालय, महेंद्र कनिष्ठ महाविद्यालय, आठवले समाजकार्य महाविद्यालय, महर्षी विद्यालय, राॅयल पब्लिक स्कूल, लालबहादूर शास्त्री विद्यालय, नूतन कन्या विद्यालय, जेसीस काॅन्व्हेंट, जकातदार विद्यालय, जेएम पटेल महाविद्यालय यासह सिल्ली येथील विनोद विद्यालय, बेलाचे सेंटर पिटर्स स्कूल, शहापूर येथील नानाजी जोशी विद्यालयाचा समावेश आहे.
- दुसऱ्या पेपरसाठी आरएम पटेल महाविद्यालय, नगरपरिषद गांधी विद्यालय, संत शिवराम विद्यालय, महिला समाज विद्यालय, सनी स्प्रिंगडेल, महर्षी विद्या मंदिर, राॅयल पब्लीक स्कूल, लाल बहादूर शास्त्री विद्यालय, जकातदार विद्यालय, जिजामाता विद्यालय, नूतन कन्या विद्यालय, जेसीस काॅन्व्हेंट, जेएम पटेल काॅलेज, बेला येथील सेंट पिटर्स स्कूल या केंद्रांचा समावेश आहे.
कोरोना नियमांचे पालन अनिवार्य
- टीईटी परीक्षेसाठी केंद्रावर येणाऱ्या कर्मचारी आणि परीक्षार्थ्यांना कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. परीक्षेस येताना प्रवेशपत्रासोबत आधारकार्ड, पॅन कार्ड यासारखे एखादे ओळखपत्र सोबत बाळगावे लागेल. परीक्षा सुरु होण्यापूर्वी २० मिनीटे आधी परीक्षागृहात प्रवेश देण्यात येईल. केंद्र परिसर व परीक्षागृहात मोबाईल वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.