शिक्षक, कर्मचाऱ्यांची ८०७ पदे रिक्त; पदभरतीअभावी प्राथमिक शिक्षणाचा खेळखंडोबा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 01:12 PM2024-08-27T13:12:00+5:302024-08-27T13:14:12+5:30
प्राथमिक शिक्षणाचा पाया कमकुवत : कसे मिळणार दर्जेदार शिक्षण?
युवराज गोमासे
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शासनाने प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. गोरगरिबांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षणाचे जाळे विणले गेले आहे. परंतु, अलीकडे पदभरतीअभावी प्राथमिक शिक्षणाचा खेळखंडोबा होत आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात वर्ग ३ कर्मचाऱ्यांची ८०७ पदे रिक्त आहेत. प्रभारावर शिक्षण विभागाचा डोलारा सुरू आहे. परिणामी ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण कसे मिळणार, असा प्रश्न आहे.
भंडारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात वर्ग ३ कर्मचाऱ्यांची ३,४२३ पदे मंजूर आहेत. त्यापैकी २६१६ पदे भरली असून ८०७ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये शिक्षण विस्तार अधिकारी, कनिष्ठ विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, उच्च श्रेणी मुख्याध्यापक, प्राथमिक शिक्षक, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक, उच्च श्रेणी माध्यमिक शिक्षक, निम्न श्रेणी माध्यमिक शिक्षक, प्रयोगशाळा सहायक, प्रयोगशाळा परिचर आदी पदांचा समावेश आहे.
रिक्त पद भरतीची मागणी वारंवार होत आहे; परंतु शासन-प्रशासन कमालीचे दुर्लक्ष करीत आहे. रिक्त पदांचा कारभार प्रभारावर चालविला जात आहे. शिक्षणाचे मूलभूत कार्य मागे पडत असून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता व दर्जा कमालीने घसरत चालला आहे.
माध्य., महाविद्यालयीन शिक्षण अडचणीत
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांची ६२ पदे, उच्च श्रेणी माध्यमिक शिक्षकांची ११५ पदे, निम्न श्रेणी माध्यमिक शिक्षकांची ७९ पदे रिक्त आहेत. पूर्वी घड्याळी तासिकाप्रमाणे शिक्षकांना शासनाकडून मानधन मिळायचे. परंतु, तेही मिळत नसल्याने आता जिल्हा निधीतून पैसा दिला जात आहे.
प्राथमिक शिक्षकांची ४७६ पदे रिक्त
जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांच्या २,६१२ पदांना मान्यता आहे. सद्यस्थितीत २,१३६ पदे भरली असून ४७६ पदे रिक्त आहेत. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या गरिबांच्या मुलांना शिक्षित करण्याची मुख्य जबाबदारी प्राथमिक शिक्षकांवर असते. परंतु, रिक्त पदांमुळे प्राथमिक शिक्षणाचा पायाच ढासळत चालला आहे.
"शासन प्राथमिक शिक्षणासाठी पैसा देत नाही, पदभरती करीत नाही. शासनाकडे रोहयो कुशल कामांसाठी पैसा नाही, मोदी आवास योजनेसाठी निधीचा ठणठणाट आहे. पूर्वी घड्याळी तासिकाप्रमाणे शिक्षकांना मिळणारे शासनाचे मानधन बंद झाले. त्यासाठी आता जिल्हा निधीतून पैसा द्यावा लागत आहे. गरिबांची मुले शिक्षणापासून वंचित राहावी का?"
- रमेश पारधी, सभापती, शिक्षण विभाग, भंडारा.
गटशिक्षणाधिकाऱ्यांची ६ पदे रिक्त जिल्ह्यात गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या ७ पदांपैकी ६ पदे रिक्त आहेत. केवळ पवनी तालुक्यातील गटशिक्षणाधिकाऱ्याचे पद भरले गेले आहे. उर्वरित सहा रिक्त पदांचा प्रभार विस्तार अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षण विभागाचे कामकाज ढेपाळल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
वर्ग ३ ची मंजूर, भरलेली व रिक्त पदे
पदाचे नाव मंजूर भरलेली रिक्त
विस्तार अधिकारी (शिक्षण) १२ ०७ ०५
कनिष्ठ विस्तार अधिकारी १९ १६ ३
केंद्र प्रमुख ६० २२ ३८
उच्च श्रेणी मुख्याध्यापक १२५ १२१ ४
प्राथमिक शिक्षक २६१२ २१३६ ४७६
मुख्याध्यापक ३० २८ २
उप मुख्याध्यापक ०१ ०१ ०
पर्यवेक्षक ०६ ० ०६
कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक ९५ ३३ ६२
उच्च श्रेणी माध्य. शिक्षक २३१ ११६ ११५
निम्न श्रेणी माध्य. शिक्षक १८७ १०८ ७९
प्रयोगशाळा सहायक १३ ८ ५
प्रयोगशाळा परिचर ३२ २० १२