८२ गावेच दुष्काळग्रस्त कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2016 12:18 AM2016-04-09T00:18:50+5:302016-04-09T00:18:50+5:30
तुमसर व मोहाडी तालुक्यात खरीप व रबी पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेले. प्रशासनाने ५० पैशांच्या आत आणेवारी दाखविली.
पंचबुध्दे यांचा आरोप : शेतकऱ्यांवर अन्याय, महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष
तुमसर : तुमसर व मोहाडी तालुक्यात खरीप व रबी पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेले. प्रशासनाने ५० पैशांच्या आत आणेवारी दाखविली. केवळ ८२ गावांना दुष्काळग्रस्त दाखविण्यात आले. भौगोलिकदृष्ट्या तुमसर व मोहाडी तालुक्यांच्या सीमा लागल्या आहेत. दोन्ही तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य के. के. पंचबुध्दे यांनी केली आहे.
तुमसर व मोहाडी तालुक्यात सिंचनाच्या सोयी केवळ कागदावर आहेत. तुमसर तहसील प्रशासनाने केवळ १२ गावांची आणेवारी ५० पैशाच्या खाली दाखविली. मोहाडी तालुक्यात ७० गावांची आणेवारी ५० पैशाच्या आत आहे. दोन्ही तालुक्यातील सर्वच गावे दुष्काळात होरपडत आहेत. दोन्ही तालुक्याच्या सीमा लागुन आहेत. तुमसर व मोहाडी तालुक्यातील केवळ ८२ गावे दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आली. जी गावे दुष्काळग्रस्त घोषित झाली व जी गावे दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आली नाही त्यात कोणताच फरक नाही. खरीप व रबीची दोन्ही पीक येथे शेतकऱ्यांच्या हातून गेली आहेत. बानवथडी प्रकल्पातून केवळ २० टक्के शेतकऱ्यांनाच सिंचनाचा लाभ मिळाला. तलावातून केवळ बोटावर मोजण्याइतक्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला.
वैनगंगेच्या काठावरची गावे सुध्दा दुष्काळाच्या छायेत आहेत. महसूल प्रशासनाने केलेली आणेवारी दोषपूर्ण आहे. येथे शेतकऱ्यात प्रचंड असंतोष खदखदत आहे. शासनाने येथे पुन्हा सर्वे करावा. तुमसर तालुक्यातील केवळ १२ गावांचा समावेश करण्यात आला. एका गावाजवळील दुसरे गाव येथे दुष्काळग्रस्त यादीत नाही. रस्ता ओलांडल्यानंतर दुसऱ्या गावाच्या सीमा सुरु होतात. एक गाव दुष्काळग्रस्त व दुसरे गाव दुष्काळग्रस्त नाही, हे कसे काय शक्य आहे. असा प्रश्न के.के. पंचबुध्दे यांनी उपस्थित केला. शासन व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तुमसर व मोहाडी तालुक्यातील गावे दुष्काळग्रस्त घोषित झाली नाही. दोन्ही तालुके ुदुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य के.के. पंचबुध्दे यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)