भंडारा जिल्ह्यातील ८२२२ नवसाक्षर परीक्षेत उत्तीर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 05:59 PM2024-05-09T17:59:03+5:302024-05-09T17:59:32+5:30
नवभारत साक्षरता कार्यक्रम : चाचणी परीक्षेचा निकाल जाहीर
भंडारा : उल्लास - नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत भंडारा जिल्ह्यातील नोंदणीकृत ८८२० पैकी ८२२२ नवसाक्षर परीक्षेत उत्तीर्ण झाले असून, या परीक्षेच्या माध्यमातून त्यांनी निरक्षरतेचा कलंक पुसून टाकला आहे.
भंडारा जिल्ह्यासाठी राज्यस्तरावरून २०२२-२३ व २०२३-२४ साठी ९१६९ असाक्षर नोंदणीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी ८८२० नवसाक्षरांची उल्लास ॲपवर नोंदणी करण्यात आली. १७ मार्च रोजी जिल्ह्यातील ७५५ परीक्षा केंद्रांवर पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. ८८२० नोंदणीकृत असाक्षरांपैकी ५६६ असाक्षर परीक्षेला गैरहजर होते. तर ८२२२ (९३.२२ टक्के) नवसाक्षर उत्तीर्ण झाले आहेत. त्यात २८७२ पुरुष व ५३५० महिलांचा समावेश आहे.
या परीक्षेसाठी १५ ते ३५ वयोगटातील ११४०, ३६ ते ६५ वयोगटातील ५६०८ व ६६ वर्षांवरील १५०६ नवसाक्षरांचा समावेश होता.
जात प्रवर्गनिहाय अनुसूचित जातीचे ९४४, अनुसूचित जमातीचे ९६०, इतर मागासवर्गीय ६२२३, अल्पसंख्याक ४८ व सर्वसाधारण प्रवर्गातील ७९ नवसाक्षर परीक्षेला बसले होते. मात्र, ३२ नवसाक्षरांना या परीक्षेत ‘सुधारणा आवश्यक’ असा शेरा मिळाल्याने त्यांना आगामी सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या फेरपरीक्षेत पुन्हा संधी दिली जाणार आहे.
असा आहे जिल्ह्याचा निकाल
तालुका प्रविष्ट उत्तीर्ण सुधारणा आवश्यक
भंडारा - १६७७ १६५९ १८
मोहाडी - ११४६ ११४६ ००
तुमसर - १५१३ १५१३ ००
साकोली - ८७१ ८७१ ००
लाखनी - १००६ १००४ ०२
लाखांदूर - ९५० ९५० ००
पवनी - १०९१ १०७९ १२
एकूण - ८२५४ ८२२२ ३२
जिल्ह्यात शिक्षण संचालक (योजना) महेश पालकर यांच्या प्रेरणेने तसेच जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर व मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी यांच्या मार्गदर्शनाखाली भंडारा डायटचे प्राचार्य, उपशिक्षणाधिकारी, सर्व गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, साधन व्यक्ती तसेच विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी यांच्या सहकार्याने नवभारत साक्षरता कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. या कामी सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, स्वयंसेवक आणि शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी यांनी मोलाची भूमिका बजावली. आगामी शैक्षणिक वर्षात सर्वांच्या सहकार्यातून जिल्ह्यात नवसाक्षरांसाठी डिजिटल, आर्थिक साक्षरतेच्या अनुषंगाने विविध उपक्रम राबविण्याचा मानस आहे.
- रवींद्र सोनटक्के, शिक्षणाधिकारी (योजना), जिल्हा परिषद, भंडारा.