भंडारा जिल्ह्यात महापुराचा ८२५१ कुटुंबांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 07:00 AM2020-09-03T07:00:00+5:302020-09-03T07:00:12+5:30

वैनगंगा नदीला अचानक आलेल्या महापुराचा फटका जिल्ह्यातील ८ हजार २५१ कुटुंबांना बसला असून ७८ तात्पुरत्या शिबिरात २७ हजार ३४७ नागरिकांनी आश्रय घेतला आहे.

8251 families hit by floods in Bhandara district | भंडारा जिल्ह्यात महापुराचा ८२५१ कुटुंबांना फटका

भंडारा जिल्ह्यात महापुराचा ८२५१ कुटुंबांना फटका

googlenewsNext
ठळक मुद्दे७८ शिबिरात २७ हजार नागरिक आश्रयाला

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : वैनगंगा नदीला अचानक आलेल्या महापुराचा फटका जिल्ह्यातील ८ हजार २५१ कुटुंबांना बसला असून ७८ तात्पुरत्या शिबिरात २७ हजार ३४७ नागरिकांनी आश्रय घेतला आहे. पुरानंतरच्या उपाययोजनांना प्रशासनाकडून गती देण्यात आली असून पूरग्रस्त गावात साथरोग पसरू नये म्हणून उपाययोजना केल्या जात आहेत.

मध्यप्रदेशातील सिंचन प्रकल्पांचे पाणी सोडल्याने शनिवारी रात्रीपासून वैनगंगेला महापूर आला. तीन दिवस जिल्ह्याला महापुराचा वेढा होता. आता महापूर ओसरला असून प्रशासनाच्या वतीने नुकसानीचा अंदाज घेतला जात आहे. जिल्ह्यातील १०३ गावांना पुराचा फटका बसला असून आठ हजार २५१ कुटुंब या महापुरात उद्ध्वस्त झाली. ३० बोटींसह १३० जवानांनी तीन दिवसात २७ हजार ३४७ नागरिकांना पुरातून सुरक्षित बाहेर काढले. या सर्वांची व्यवस्था ७८ तात्पुरत्या शिबिरात करण्यात आली आहे.

महापुराने नदीतिरावरील अनेक शेतशिवार पाण्याखाली गेले होते. आता कृषी विभागाच्या वतीने सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. नजरअंदाजानुसार ७ हजार ५०० हेक्टरवरील पीक महापुरात वाहून गेल्याची माहिती आहे. संपूर्ण पंचनामे झाल्यानंतर यात वाढ होण्याची शक्यता आहे. वीज वितरणचे १२५१ रोहित्र बंद पडले होते. त्यापैकी ९० रोहित्र नवीन लावण्यात आले असून इतर सर्व रोहित्र आता सुरळीत सुरु झाले असून वीज पुरवठाही सुरु करण्यात आला आहे. महापुरात वीज वितरण कंपनीला ३ कोटी २० लाख रुपयांचा फटका बसल्याची माहिती आहे.

प्रशासनाकडून उपाययोजना
पुराचे पाणी ओसरले असून पुरानंतरच्या उपाययोजनांना जिल्हा प्रशासनाने गती दिली आहे. जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. नुकसानीचे पंचनामे, घरातील गाळ काढणे, स्वच्छ पाणी पुरवठा, साथरोग पसरू नये म्हणून फवारणी तसेच जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुरानंतरच्या उपाययोजना गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

उद्ध्वस्त घरे पाहून अश्रू अनावर
वैनगंगेच्या कोपाने अनेकांचे स्वप्न उद्ध्वस्त झाले. तीन दिवसानंतर पूर उतरल्यानंतर पूरग्रस्त आपल्या घराचा अदमास घेत आहेत. उद्ध्वस्त झालेली घरे पाहून पूरग्रस्तांना अश्रू अनावर होत आहेत. महापुरानंतर घरात काही बचावले काय याची चाचपणी घेत आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक फटका भंडारा तालुक्यातील ३५ गावांना बसला आहे. या गावात आता उद्ध्वस्त झालेली घरे आणि चिखल दिसत आहे.

Web Title: 8251 families hit by floods in Bhandara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :floodपूर