जिल्ह्यातील ६३ प्रकल्पात ८४ टक्के जलसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 05:00 AM2020-09-27T05:00:00+5:302020-09-27T05:00:27+5:30
२६ सप्टेंबर रोजी चांदपूर मध्यम प्रकल्पात ९८.९२ टक्के, बघेडा ७५.७६ टक्के, बेटेकर बोथली ७८.३६ तर सोरणा जलाशयात ३३.७४ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. जिल्ह्यात ३१ लघु प्रकल्प आहे. जुने मालगुजारी तलावांची संख्या २८ आहे. सध्या स्थितीत ३१ लघु प्रकल्पात उपयुक्त जलसाठा ८३.४० टक्के आहे. माजी मालगुजारी तलावात पाण्याचा साठा ८१.२१ टक्के आहे.
देवानंद नंदेश्वर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भंडारा पाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या ६३ मध्यम, लघु, जुने मालगुजारी प्रकल्पात शनिवार रोजी ८३.८५ टक्के जलसाठा आहे. हा जलसाठा गतवर्षीच्या तुलनेत २.५७ टक्के कमी आहे. तर २०१८ मध्ये जलसाठा ६४.७९ टक्के एवढा होता.
भंडारा जिल्ह्यात ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नदी, नाल्यांना पूर आला होता. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात काही प्रमाणात पावसाने हजेरी लावली. परिणामी जिल्ह्यातील ६३ प्रकल्पातील जलसाठा अधिक आहे. जिल्ह्यात लघुपाटबंधारे विभागांतर्गत चार मध्यम प्रकल्प आहेत. यात तुमसर तालुक्यातील चांदपूर, बघेडा. मोहाडी तालुक्यातील बेटेकर बोथली आणि सोरणा प्रकल्पाचा समावेश आहे.
२६ सप्टेंबर रोजी चांदपूर मध्यम प्रकल्पात ९८.९२ टक्के, बघेडा ७५.७६ टक्के, बेटेकर बोथली ७८.३६ तर सोरणा जलाशयात ३३.७४ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. जिल्ह्यात ३१ लघु प्रकल्प आहे. जुने मालगुजारी तलावांची संख्या २८ आहे. सध्या स्थितीत ३१ लघु प्रकल्पात उपयुक्त जलसाठा ८३.४० टक्के आहे. माजी मालगुजारी तलावात पाण्याचा साठा ८१.२१ टक्के आहे. यावर्षी ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने जुलै महिन्यात कोरडेठण्ण असलेल्या प्रकल्पांमध्ये पाण्याचा मुबलक साठा आहे.
सध्यस्थितीत उच्च प्रतीच्या धानाला एका पावसाची गरज आहे. त्यामुळे लघु पाटबंधारे विभागाच्या प्रकल्पातील पाणी धान पिकासाठी संजीवनी ठरणार आहे. बहुतांश माजी मालगुजारी तलावाचे देखभाल दुरूस्ती नसल्याने येथील पाणी व्यर्थ जात असल्याचे देखील निदर्शनास येते. येत्या वर्षात मामा जलाशयांचे दुरूस्ती करणे गरजेचे झाले आहे.
१७ प्रकल्पात शतप्रतिशत जलसाठा
यावर्षी ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व सप्टेंबर महिन्यात काही दिवस झालेल्या पावसाने जलाशयात मुबलक जलसाठा आहे. भंडारा जिल्ह्यातील ६३ प्रकल्पात १०२.५० दलघमी उपयुक्त साठा आहे. एका जलाशयात २५ टक्केपर्यंत, पाच प्रकल्पात २५ ते ५० टक्के, नऊ प्रकल्पात ५० ते ७५ टक्के, ३१ प्रकल्पात ७५ ते ९९ टक्के तर १७ प्रकल्पात शतप्रतिशत जलसाठा आहे. शंभर टक्के पाणी असलेल्या १७ प्रकल्पांमध्ये डोंगरला, कारली, सिवनीबांध, भुगाव मेंढा, मुरमाडी हमेशा, न्याहारवानी, वाकल, खुर्शीपार, सावरबंध, खंडाळा, सानगडी, केसलवाडा, रेंगेपार कोहळी, कनेरी, चान्ना, लोभी, चप्राड आदींचा समावेश आहे. प्रकल्पांमध्ये मुबलक जलसाठा असल्याने याचा सिंचनासाठी फायदा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा आहे.