दोन वर्षात कर्करोगाने ८८ जणांचा मृत्यू
By admin | Published: January 5, 2016 12:59 AM2016-01-05T00:59:20+5:302016-01-05T00:59:20+5:30
चिमूटभर तंबाखू मनुष्याची नशा पुर्ण करतो. मात्र, अनेक घटक पदार्थानेयुक्त तंबाखू शरीरास किती घातक आहे, ..
प्रशांत देसाई भंडारा
चिमूटभर तंबाखू मनुष्याची नशा पुर्ण करतो. मात्र, अनेक घटक पदार्थानेयुक्त तंबाखू शरीरास किती घातक आहे, याची कल्पना मनुष्याला येत नाही. त्यामुळे क्षणभरासाठी तंबाखूतून नशेचा आनंद मिळत असला तरी यामुळे मागील दोन वर्षात जिल्ह्यात कर्करोगाने ग्रस्त ८८ जणांचा मृत्यू झाला आहे. यात ४५ महिला व ४३ पुरूषांचा समावेश असून तुमसर तालुक्यात सर्वाधिक ३४ तर लाखांदूर येथे केवळ एकाचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
जिल्हा सामान्य रूग्णालयात मागील दोन वर्षांपासून ते २६ सप्टेंबर २०१५ पर्यंत कर्करोगाने मृत्यू झालेल्यांची नोंद आहे. यात ८८ रूग्णाचा मृत्यू झाला असून त्यात तुमसर तालुक्यात मृत्यूसंख्या सर्वाधिक आहे. भंडारा तालुका दुसऱ्या क्रमांकावर आहे. सर्वात कमी मृत्यू लाखांदूर येथे झाले असून तिथे एका महिलेचा कर्करोगाने मृत्यू झाल्याची नोंद आहे. तंबाखूमुळे मानवाचे आर्युमान सरासरी १५ वर्षाने कमी होते. तंबाखू हे व्यापारी उत्पादन असून त्यामुळे होणारे मृत्यू व एवढी मनुष्यहानी जगातील कुठल्याही व्यापारी उत्पादनाने होत नाही.
तंबाखूमुळे गभर्पात होऊ शकतो.
तंबाखूमुळे स्त्रियांना होणारे बाळ कमी वजनाचे, मतिमंद, जन्मजात शारीरिक व्याधीसह वा मृत जन्माला येते. तंबाखूमुळे स्त्रियांच्या हिरड्यांना रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे हिरड्यांचे विकार वाढतात, त्यामुळे दात अकाली पडतात व विद्रुप दिसू शकतात. कर्करोग होण्यामागे तंबाखू हे मुख्य कारण असले तरी शितपेयाचे अतिसेवन, अनुवांशिकता, अनियमित आहार, क्ष-किरणाच्या संपर्कात राहणे, फास्टफुड यांच्यामुळे धोका होतो.
महिलांना उद्भवू शकतो त्रास
तंबाखूमुळे स्त्रियांना गर्भाशयाचा, फुफ्फुसाचा, तोंडाचा व इतर अवयवांचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते. तंबाखूमुळे स्त्रियांची प्रजनन क्षमता घटू शकते व रजोनिवृत्ती लवकर येऊ शकते.
तंबाखूमुळे होणारे दृष्परिणाम लक्षात घेता जे लोक सध्या तंबाखूचे सेवन करीत आहेत, त्यांना व्यसन सोडण्यापासून परावृत्त करणे गरजेचे आहे. तंबाखू सेवनापासून परावृत्त केल्यास मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. शासकीय रूग्णालयात कर्करोग तपासणी शिबिर घेण्यात येतात.
- डॉ. देवेंद्र पातूरकर,
जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रूग्णालय, भंडारा.