९,२३८ उमेदवारांचे भाग्य मशीनबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 10:15 PM2017-10-16T22:15:21+5:302017-10-16T22:15:59+5:30
थेट सरपंचपदासाठी पहिल्यांदाच झालेल्या जिल्ह्यातील ३६२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सोमवारला शांततेत मतदान पार पडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : थेट सरपंचपदासाठी पहिल्यांदाच झालेल्या जिल्ह्यातील ३६२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सोमवारला शांततेत मतदान पार पडले. १,२३४ मतदान केंद्रावर सरासरी ८८ टक्के मतदान झाले. या निवडणुकीत ९ हजार २३८ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मशिनबंद झाले असून मंगळवारला होणाºया मतमोजणीअंती कोणत्या उमेदवाराच्या घरी दिवाळीचे फटाके फुटतील हे दुपारपर्यंत समजेलच.
३६२ ग्रामपंचायतीमध्ये ३६२ सरपंचपदासह ३,०२४ सदस्यपदाची निवडणूक पार पडली असून एकूण ३,३८६ पदासाठी ९,२३८ उमेदवारांनी निवडणूक लढविली. तत्पूर्वी लाखांदूर तालुक्यातील पेंढरीत सरपंचपदासह सात सदस्यांची निवडणूक अविरोध पार पडली होती. सरपंचपदासाठी १,५७६ तर सदस्यपदासाठी ७,६६२ उमेदवार रिंगणात होते. तुमसर तालुक्यात ७७, मोहाडी तालुक्यात ५८, भंडारा तालुक्यात ३९, पवनी तालुक्यात ४५, साकोली तालुक्यात ४१, लाखनी तालुक्यात ५१, लाखांदूर तालुक्यात ५१ ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली.
भंडारा जिल्ह्यातील १,२३४ मतदान केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्याने मतदान केंद्रावर शांतता दिसून आली. काही मतदान केंद्रावर किरकोळ वाद वगळता अनुचित घटना घडली नाही. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांची विशेष गस्त दिवसभर फिरताना दिसून आली. संवेदनशिल व अतिसंवेदनशिल गावांमध्ये पोलीस नजर ठेऊन होते. चारचाकी वाहनांद्वारे मतदारांना केंद्रावर आणण्याचे काम सुरू होते. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वात अतिरिक्त पोलीस अधीक्षक, चार उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, कर्मचारी, होमगार्डसह राज्य राखीव पोलीस दलाची एक कंपनी आणि राज्य राखीव पोलीस दलाचे दोन प्लाटून तैनात करण्यात आले होते.
येथे होणार तालुकानिहाय मतमोजणी
सोमवारला झालेल्या मतदानाची मतमोजणी मंगळवारला सकाळी १० वाजतापासून सुरू होणार आहे. तुमसर तालुक्यातील मतमोजणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत, मोहाडी तालुक्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत, भंडारा तालुक्यातील पोलिस बहुउद्देशीय सभागृहात, पवनी तालुक्यातील नगर परिषद विद्यालय, साकोली तालुक्यातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात, लाखनी तालुक्यातील समर्थ महाविद्यालयात तर लाखांदूृर तालुक्यातील मतमोजणी शासकीय तंत्र विद्यालयात होणार आहे. दुपारी १ ते २ वाजतापर्यंत जिल्ह्यातील सर्वच निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
११२ टेबलवर होणार मतमोजणी
३६२ ग्रामपंचायतीसाठी तालुक्यातील सातही मतमोजणी केंद्रावर प्रत्येकी १५ ते १६ टेबल असे ११२ राहतील. य टेबलवर प्रत्येकी ३५ ते ४० असे २६६ कर्मचारी मतमोजणी करतील. मतमोजणी दरम्यान प्रत्येक ठिकाणी ५० पोलीस याप्रमाणे ३५० पोलिसांचा बंदोबस्त तैनात राहणार आहे.
आचारसंहिता उल्लघंनप्रकरणी गुन्हा दाखल
अज्ञात आरोपीने विश्व हिंदु परिषद क्षत्रिय राजाभोज पवार या नावाने प्रचार करण्याच्या हेतुने काढलेली पत्रके सालेभाटा येथील पोलीस पाटील यांना सापडली. याप्रकरणी लाखनी तालुका ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिताप्रमुख मिलींद बगडे यांच्या लेखी तक्रारीवरून लाखनी पोलिसांनी भादंवि १७१, ह (२) (३), सहकलम २ (४) खाजगी सार्वजनिक विद्रुपीकरण कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेशपूर, बेला ग्रामपंचायतच्या निकालाकडे लक्ष
जिल्ह्यातील सर्वात मोठी असलेल्या आणि प्रतिष्ठेची निवडणूक असलेल्या गणेशपूर आणि बेला ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदी कोण विजयी होणार याकडे नागरिकांसह राजकीय पदाधिकाºयांचे लक्ष लागलेले आहे.