९५ पोलीस कर्मचाऱ्यांचा पदोन्नतीचा प्रश्न कायम
By Admin | Published: December 21, 2015 12:28 AM2015-12-21T00:28:18+5:302015-12-21T00:28:18+5:30
जिल्हा पोलीस दलातील पदोन्नतीस पात्र असलेल्या पोलीस शिपाई, पोलीस नायक यांना डावलून आंतरजिल्हा बदलीवरून ...
भंडारा : जिल्हा पोलीस दलातील पदोन्नतीस पात्र असलेल्या पोलीस शिपाई, पोलीस नायक यांना डावलून आंतरजिल्हा बदलीवरून आलेल्या पोलिसांना नियमबाह्यरीत्या पदोन्नती देण्यात आली आहे. त्यामुळे पात्र असूनही अपात्रतेचा ठपका ठेवलेल्या ९५ पोलीस कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रश्न आजही प्रलंबित आहे. याकडे राज्याचे मुख्यमंत्री लक्ष देतील काय, असा प्रश्न या कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
सन १९९९ मध्ये भंडारा पोलीस दलातून गोंदिया जिल्हा वेगळा झाला. त्यानंतर गोंदिया जिल्हा व राज्य राखीव पोलीस दलातून आलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना भंडारा जिल्हा पोलीस दलात समाविष्ठ करण्यात आले. सन १९९९ ते २००७ या कालावधीत एकूण १२१ पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस शिपाई पदावर नियमानुसार घेऊन त्यांना त्यांच्या सेवाज्येष्ठतेनुसार लावण्यात आले. इथपर्यंत सर्व नियमानुसार सुरू होते.
त्यानंतर सन २००८ पासून सन २०१३ पर्यंत आंतरजिल्हा बदलीवर ९८ पोलीस कर्मचारी जिल्ह्यात आले. त्यातील ६९ कर्मचाऱ्यांना त्यांचे मुळ जिल्ह्यातील पोलीस नायक पदावर व उर्वरित २९ कर्मचाऱ्यांना पोलीस शिपाई म्हणून घेण्यात आले. यामध्ये सन २००० ते २००८ पर्यत आंतरजिल्हा बदलीवर आलेल्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता डावलून सन २००८ नंतर आंतरजिल्हा बदलीवर आलेल्या ६९ पोलीस नायकांना त्यांची मुळ जिल्ह्यातील पोलीस नायक पदाची पदोन्नती तारीख कायम ठेवण्यात आली. त्यापैकी ४३ कर्मचाऱ्यांना पोलीस हवालदार पदावर पदोन्नती देण्यात आली. तसेच उर्वरित २६ कर्मचाऱ्यांना नायक पदाच्या ज्येष्ठतासूचीत वरिष्ठ स्थान देण्यात आले आहे. हा सर्व प्रकार नियमबाह्य आहे. यामुळे भंडारा जिल्ह्यातील ९५ सेवाज्येष्ठता असलेल्या कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला आहे.
अपर पोलीस महासंचालक (आस्थापना) मुंबई यांच्या दि.५ आॅगस्ट २००५ च्या पत्रानुसार आंतरजिल्हा बदलीबाबात स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. परंतु, भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने या निर्देशाची तमा न बाळगता मनमर्जीप्रमाणे पदोन्नती दिली आहे. अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांपेक्षा कमी सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. त्यामुळे भविष्यात हे कर्मचारी त्यांनी चूक नसतानाही कर्मचारी सहायक फौजदार, पोलीस हवालदार पदाच्या पदोन्नतीपासून वंचित राहणार आहेत. त्याचा परिणाम त्यांच्या सेवानिवृत्ती वेतनावर होणार आहे. (नगर प्रतिनिधी)
रिक्त असूनही पदोन्नतीची पदे भरली नाहीत
जिल्हा पोलीस दलात पोलीस नायक, हवालदार यांची अनेक पदे रिक्त होती. त्यामुळे या पदासाठी पात्र असलेल्या पोलीस नायकांची पदोन्नती रिक्त पदावर करणे आवश्यक होते. परंतु, तसे न करता बाहेरून आलेल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती देऊन ती पदे भरण्यात आली. त्यामुळे आम्ही पदोन्नतीसाठी लायक नाही काय? असा संतापजनक प्रश्न अन्यायग्रस्त कर्मचारी उपस्थित करीत आहेत. या सर्व प्रकारात मोठे अर्थकारण दडले असल्याचा आरोपही या कर्मचाऱ्यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा
याबाबत अनेक तक्र ारी करूनही कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत. हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी या समस्येवर तोडगा काढावा. व नियमबाह्य पदोन्नती झालेल्या कर्मचाऱ्यांना पदनावत करून दोषी कार्यालयीन कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.