९४ वर्षाच्या आजीने इच्छाशक्ती व योगाच्या बळावर कोरोनावर केली मात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:29 AM2021-05-03T04:29:53+5:302021-05-03T04:29:53+5:30
तुमसर : तुमसर येथील एका ९४ वर्षाच्या आजीने इच्छाशक्ती व योगाच्या बळावर कोरोनावर लीलया मात केली आहे. १५ दिवसांपूर्वी ...
तुमसर : तुमसर येथील एका ९४ वर्षाच्या आजीने इच्छाशक्ती व योगाच्या बळावर कोरोनावर लीलया मात केली आहे. १५ दिवसांपूर्वी आजी कोरोना पॉझिटिव्ह आली होती. नातवाने आजी तू कशी आहेस, अशी विचारणा केल्यावर आजीने आपल्या जीवनात असे किती रोग पाहिले आणि ते गेलेही, असा आत्मविश्वासपूर्ण उद्गाराने सर्वांनाच भयमुक्त केले. माझे पती स्वातंत्र्य संग्राम सैनिक होते. त्या सैनिकाची मी पत्नी आहे. असे किती उन्हाळे, पावसाळे आपल्या जीवनात मी बघितले. हा कोरोना माझं काय बिघडवणार नाही, असा आत्मविश्वास त्या आजीच्या बोलण्यातून दिसत आहे.
या जिगरबाज आजीचे नाव कांताबाई पांडुरंग कुंभलकर (९४) राहणार गांधीवाद, तुमसर असे आहे. १५ दिवसांपूर्वी आजीच्या कुटुंबातील सर्वांनी कोरोना टेस्ट केली. यावेळी कुटुंबातील सर्व सदस्य पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे आजीलाही टेस्ट करण्यासाठी नेले. त्यात आजी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे घरात आजीची सर्वांनाच चिंता लागली. नातू जवाहर कुंभलकर यांनी आपल्या आजीशी संपर्क साधत आजी तू कशी आहेस, अशी विचारणा करताच आजीने आत्मविश्वासपूर्वक नातवाला अरे, असे जीवनात किती रोग पाहिले आणि गेलेही. या कोरोनाला मी पराभूत केल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर आजीला स्थानिक डॉ. सचिन बाळबुधे यांच्याकडे नेण्यात आले. डॉ. बाळबुधे यांनी मल्टी विटामिन औषध आजीला दिले. आजी कांताबाई यांना घरीच गृह विलगीकरणात ठेवण्यात आले. आजीने कोरोना संसर्ग काळात योग प्राणायाम सुरूच ठेवले. त्यामुळे आजीच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होऊ लागली. पंधरा दिवसात आजीची पुन्हा दुसरी टेस्ट करण्यात आली. त्यात आजी निगेटिव्ह आढळली. केवळ इच्छाशक्ती व दृढ निश्चय व दररोज योग केल्याने आजी कांताबाई यांनी कोरोनावर मात केली. सध्या आजी कांताबाई ठणठणीत आहेत. कोरोनाला घाबरून जाऊ नका, याचा प्रतिकार करा. डॉक्टरांनी सांगितलेली औषधे घ्या, जेवणाकडे लक्ष द्या, प्रसन्न चित्ताने जगा. यामुळे तुम्ही कोरोनाला हरवू शकता, असा मोलाचा संदेश दिला आहे.
बॉक्स
तीन वेळा होत्या आजी नगरसेविका
आजी कांताबाई यांचे कुटुंबच सामाजिक सेवेमध्ये वाहून घेतलेले आहे. कांताबाईचे पती पांडुरंग कुंभलकरहे स्वातंत्र्यसैनिक होते. त्यामुळे त्यांना समाजकारणाचीही आवड होती. कांताबाईंनी तुमसर पालिकेत तीनदा नगरसेविका हे पद भूषविले आहे. स्वातंत्र्यसंग्राम सैनिक तथा तत्कालीन आमदार, नगराध्यक्ष स्वर्गीय नारायणराव कारेमोरे यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केले होते.