९६७ डेरेदार वृक्षांची कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 12:21 AM2019-09-17T00:21:58+5:302019-09-17T00:22:26+5:30
वृक्ष लागवड मोहीम राबवित असतानाच राज्यमार्गाच्या रूंदीकरणासाठी एक दोन नव्हे तब्बल ९६७ वृक्षांची कत्तल करण्यात आली. तुमसर ते देव्हाडी राज्यमार्गावर सुरू असून १०० वर्ष जुने वृक्ष तोडले जात आहे. मात्र याबद्दल पर्यावरणप्रेमी शब्दही बोलायला तयार नाही. तर दुसरीकडे कत्तल झालेल्या वृक्षांच्या ठिकाणी वृक्षारोपणाचे कोणतेही नियोजन दिसत नाही.
मोहन भोयर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : शासन ३३ कोटी वृक्ष लागवड मोहीम राबवित असतानाच राज्यमार्गाच्या रूंदीकरणासाठी एक दोन नव्हे तब्बल ९६७ वृक्षांची कत्तल करण्यात आली. तुमसर ते देव्हाडी राज्यमार्गावर सुरू असून १०० वर्ष जुने वृक्ष तोडले जात आहे. मात्र याबद्दल पर्यावरणप्रेमी शब्दही बोलायला तयार नाही. तर दुसरीकडे कत्तल झालेल्या वृक्षांच्या ठिकाणी वृक्षारोपणाचे कोणतेही नियोजन दिसत नाही.
तुमसर ते देव्हाडी रस्त्याच्या चौपदरीकरणाला परवानगी मिळाली. सदर रस्ता डांबरीकरणाचा आहे. रस्ता बांधकाला तुमसर येथून सुरूवात होत आहे. हा रस्ता ब्रिटीशकालीन असून या रस्त्यावर डेरेदार वृक्ष ८० ते १०० वर्षापासून डौलाने उभे आहेत. उन्हाळ्यात सावली देत हे वृक्ष पर्यावरणाचे रक्षण करीत आहे. मात्र आता रस्ता चौपदरीकरणासाठी दोन्ही बाजूला असलेली झाडे तोडणे सुरू झाले आहे. विकास कामांचा पहिला बळी वृक्ष जात आहे. वृक्षांच्या बचावाकरीता कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाही. डेरेदार वृक्ष मशीनच्या सहायाने तोडले जात आहे.
कत्तल केल्याजाणाऱ्या झाडांची किंमत ठरविण्याबाबत संबंधित विभागाने वनविभागाकडे विचारणा केली. वनविभागाने मोजमाप करून ९६७ झाडांची किंमत पाच लाख २६ हजार ६७० रूपये ठरविली आहे. ही रक्कम शासन जमा करण्यात आल्याची माहिती आहे. मुळ किंमत बाजारभावाने देण्यात आली. परंतु तेवढे मोठे झाड तयार होण्यासाठी १५ ते २० वर्ष लागणार त्याचा येथे हिशेब करण्यात आला नाही.
वृक्षारोपणाला खो
करारनाम्यानुसार तोडलेल्या वृक्षांच्या दुप्पट वृक्ष लावण्याची तरतुद आहे. परंतु झाडे लावल्यानंतर ती जगवणार कोण, यासंबंधीत करारनाम्यात कोणताही उल्लेख नाही. केवळ कागदोपत्री झाडे लावून हा रस्ता उजाड केला जात आहे. तर तुमसर-देव्हाडी रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित बांधकाम कंपनीने दिली.
तुमसर-देव्हाडी रस्ता बांधकामात ९६७ वृक्ष तोडले जाणार आहेत. स्थानिक वनविभागाने वृक्षांचे मूल्यमापन करून किंमत ठरविली. वरिष्ठस्तरावरूनच वृक्ष कापण्याची परवानगी मिळाली आहे. रस्ता बांधकामानंतर दुप्पट झाडे लावण्यात येणार आहे.
-गोविंद लुथे, वनपरिक्षेत्र अधिकारी, तुमसर.