भंडारा जिल्ह्यात १५ दिवसात ९९ व्यक्ती पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 02:34 PM2020-07-15T14:34:40+5:302020-07-15T14:36:31+5:30
भंडारा जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण २७ एप्रिल रोजी आढळून आला. त्यानंतरही रुग्णवाढीचे प्रमाण अल्प होते. मात्र जुलै महिन्याला प्रारंभ झाला आणि कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत गेली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : लॉकडाऊनच्या सुरुवातीला कोरोनामुक्त असलेल्या भंडारा जिल्ह्यासाठी जुलै महिना चिंतेत वाढ करणारा ठरला. पहिल्या १५ दिवसात तब्बल ९९ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या. आतापर्यंत जिल्ह्यात १७९ व्यक्तींना कोरोना झाल्याचे पुढे आले असून ८७ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. विशेष म्हणजे ९ जुलै रोजी सर्वाधिक ४९ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या तर दोन दिवसात दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली.
भंडारा जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण २७ एप्रिल रोजी आढळून आला. गराडा येथील महिला कोरोना पॉझिटिव्ह निघाली. त्यानंतरही रुग्णवाढीचे प्रमाण अल्प होते. उलट रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक होते. मात्र जुलै महिन्याला प्रारंभ झाला आणि कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत गेली. जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात तब्बल ९९ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या. त्यात १ जुलै रोजी ७, ४ जुलै रोजी ६, ६ जुलै रोजी ४, ७ जुलै रोजी १, ८ जुलै रोजी ८, ९ जुलै रोजी ४९, १० जुलै रोजी ६, ११ जुलै रोजी ३, १२ जुलै रोजी ६, १३ जुलै रोजी ४ आणि १४ जुलै रोजी ५ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. विशेष म्हणजे यातील बहुतांश रुग्ण हे महानगर व परप्रांतातून आलेले आहेत. विशेष म्हणजे रविवार आणि सोमवार या दोन दिवसात सलग दोन तरुणांचा मृत्यू झाला. एक भंडारा शहरातील तर एक शहरानजीकच्या गणेशपूर परिसरातील आहे.
जिल्ह्यात सुरुवातीला रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक होते. आतापर्यंत जिल्ह्यातील ८७ व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. सुरुवातीला बरे होण्याचे प्रमाण ८६ टक्के होते. मात्र जुलै महिन्यात यात घट होऊन सध्या जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४८.६० टक्के आहे. जिल्ह्यात पुणे, मुंबई व इतर राज्यातून ४५ हजार १०९ व्यक्ती दाखल झाले आहेत. महानगरातून येणाऱ्या प्रत्येकाला संस्थात्मक क्वारंटाईन किंवा होम क्वारंटाईन केले जात आहे. आतापर्यंत ४३ हजार ४१ व्यक्तींचा होम क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झाला आहे तर २०६८ व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यातच दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने आणखी भर पडली. विशेष म्हणजे जिल्ह्यात सीमावर्ती भागात नऊ चेक पोस्ट तयार करण्यात आले आहे. मात्र अलीकडच्या काही दिवसात याठिकाणी शिथीलता आल्याचे दिसत आहे.
नागपूरातून येणारे कर्मचारी, अधिकारी बिनधास्तपणे भंडारा शहरासह जिल्ह्यात येत आहेत. यासोबत व्यवसाय आणि व्यापाराच्या निमित्ताने अनेकजण जिल्ह्यातील ग्रामीण भागात येत आहेत. त्यांची कोणतीही तपासणी होत नसल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे.
आयसोलेशन वॉर्डात ९० कोरोनाबाधीतांवर उपचार
भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डात सध्या ९९ व्यक्ती भरती असून त्यापैकी ९० कोरोना बाधीत आहेत. आतापर्यंत येथून ८७ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्याने सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यातून ५ हजार ६२४ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ५ हजार २३१ नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर २१४ अहवालांची जिल्हा प्रशासनाला प्रतीक्षा आहे. तीव्र श्वासदाहचे १७२ व्यक्ती उपचारासाठी दाखल असून १७१ व्यक्तींचे नमुने तपासणीस पाठविण्यात आले होते. त्यापैकी १६७ नमुने निगेटिव्ह आले आहे.