तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या मजुरावर अस्वलाचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2023 05:29 PM2023-05-18T17:29:49+5:302023-05-18T17:30:06+5:30
किटाडी जंगलातील घटना : मजूर जखमी
- गोपालकृष्ण मांडवकर
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जंगलात तेंदुपाने तोडण्यासाठी गेलेल्या मजुरावर झुडपात दबा धरून बसलेल्या अस्वलाने हल्ला करून जखमी केल्याची घटना लाखनी वनविभाग (एफडीसीएम) अंतर्गत मांगली बिटात किटाडी जंगल परिसरात गुरुवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.
आनंदराव हिरामण चौधरी (६५, किटाडी, ता. लाखनी) असे अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मजुराचे नाव आहे. रोजगाराच्या आशेपोटी या परिसरातील मजूर भल्या पहाटे मागील आठवड्याभरापासून तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात जात आहेत. दरम्यान जंगलात गुरुवारी तेंदूची पाने तोडण्यात मग्न असताना अचानक झुडपातील अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. त्यात ते जखमी झाले.
त्यांना उपचारार्थ पालांदूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच वन विभाग (एफडीसीएम) वनपाल आर.एम.लोणारे, वनरक्षक जी.एच. डोये यांनी पंचनामा केला. अवघ्या चार दिवसातच वन्य प्राण्यांनी हल्ला केल्याच्या दोन घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
चार दिवसांपूर्वी महिलेवर हल्ला
यापूर्वी किटाडी येथील जंगलात तेंदूपत्ता संकलन करत असताना रविवार (ता.१४) रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास रानडुकराने वृद्ध महिलेवर पाठीमागून हल्ला केला होता. सत्यभामा रतिराम गोस्वामी (७२, किटाडी, ता.लाखनी) असे जखमी महिलेचे नाव आहे. जखमी महिलेवर उपचार सुरू आहेत.