तलावावर आंघोळीला गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू, चार तासानंतर सापडला मृतदेह
By ज्ञानेश्वर मुंदे | Published: September 11, 2022 05:59 PM2022-09-11T17:59:58+5:302022-09-11T18:00:35+5:30
भंडारा जिल्ह्यात तलावावर आंघोळीला गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे.
भंडारा: गावालगतचा माजी मालगुजारी तलावावर आंघोळीसाठी गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना पवनी तालुक्यातील चकारा येथे रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. सकाळी तो आज्जीला बाहेर जात असल्याचे सांगून निघून गेला होता. त्यानंतर सकाळी १० वाजता त्याची सायकल व कपडे तलावाच्या काठावर आढळून आली असता एकच खळबळ उडाली.
दरम्यान, भारत ओमप्रकाश पाठक (१५) रा.चकारा असे मृत मुलाचे नाव आहे. तो अड्याळ येथील विवेकानंद विद्याभवनचा नवव्या वर्गाचा विद्यार्थी होता. त्याची आई बाहेरगावी गेली होती. आजीने सकाळी त्याला जेवण करायला सांगितले. मात्र बाहेर जाऊन लवकर येतो असे म्हणून तो घरातून निघून गेला. त्यानंतर सकाळी १० वाजताच्या सुमारास गावालगतच्या मालगुजारी तलावावर सायकल, कपडे व चपला दिसून आल्या. ही माहिती गावात होताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अड्याळचे ठाणेदार सुधीर बोरकुटे कर्मचाऱ्यांसह दाखल झाले. सौंदड येथील मासेमारांना शोधण्यासाठी पाचारण करण्यात आले. तब्बल चार तासाच्या प्रयत्नानंतर दुपारी २ वाजता त्याचा मृतदेह आढळून आला. पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अड्याळ ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला.
वडिलांचाही तलावात बुडून झाला होता मृत्यू
भारतचे वडील ओमप्रकाश यांचा चार वर्षापूर्वी तलावातच बुडून मृत्यू झाला होता. रविवारी मुलाचाही मृत्यू झाल्याने संपूर्ण गाव हळहळत होते. शोधमोहीमेनंतर भारतचा मृतदेह हाती लागला. तेव्हा नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. अड्याळ ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.