नव्या संचमान्यतेचा धसका; शिक्षकांनी सुरू केली विद्यार्थ्यांची शोधमोहीम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 01:07 PM2024-05-03T13:07:41+5:302024-05-03T13:10:33+5:30
शिक्षकांचे वाढले 'टेन्शन' : मात्र, इंग्रजी शाळांकडे वाढला विद्यार्थ्यांचा कल
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राज्य शासनाच्या ५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी संचमान्यतेचे नवीन निकष लागू करण्यात आले आहेत. हे निकष सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून अंमलात येणार आहेत. त्यामुळे बहुतांश शाळांमध्येशिक्षकांची संख्या कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या निर्णयाने शिक्षकांचे टेन्शन वाढल्याचे दिसून येत आहे. संच टिकविण्यासाठी शिक्षकांची गावागावांत भटकंती सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
अलीकडे इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे विद्यार्थी व पालकांचा कल वाढला आहे. अशातच मराठी शाळांसाठी शासनाच्या संचमान्यतेच्या शासन निर्णयामधील बऱ्याच अटी शर्ती असून, त्या जाचक ठरत आहेत. या निकषांचा विचार केल्यास वर्ष २०२४-२५ पासून शिक्षक संख्या मान्यतेचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. ते प्रमाण टिकवणेदेखील अवघड असणार आहे. संचमान्यतेच्या निकषानुसार पटसंख्या वाढविण्यावर शिक्षकांकडून अधिक भर दिला जात आहे. जिल्हा परिषद शाळासह अन्य अनुदानीत शाळांतही पटसंख्या रोडावली आहे.
संचमान्यतेचे नवे निकष याप्रमाणे
शासनाच्या संचमान्यतेची संदर्भ तारीख ३० सप्टेंबरपर्यंतची असणार आहे. द्विशिक्षकी शाळांमध्ये ६० पटासाठी किमान दोन शिक्षक असणार आहेत. मात्र, तिसरा शिक्षक पात्र होण्यासाठी किमान १६ मुलांची अधिकची आवश्यकता असणार आहे.
तीन शिक्षक टिकविण्यासाठी किमान ७६ पटसंख्या असणे आवश्यक आहे. २० पटसंख्येच्या शाळेमध्ये दोन शिक्षक असणार. तथापि, एक नियमित शिक्षक आणि दुसरा सेवानिवृत्त शिक्षक, अशी दोन पदे असणार आहेत.
पटसंख्या दहापर्यंत किवा त्यापेक्षा कमी असल्यास फक्त एक शिक्षक मान्य होणार आणि तोही सेवानिवृत्त शिक्षकांमधून नेमला जाणार आहे.
इयत्ता सहावी ते आठवीमध्ये एकच वर्ग असल्यास ३५ पर्यंत एक शिक्षक आणि त्यापुढे ५३ पटानंतर दुसरा शिक्षक मान्य होणार आहे. तर तिसऱ्या शिक्षकासाठी किमान ८८ पटसंख्या लागणार आहे.
आठवीपर्यंत १५० विद्यार्थी पटसंख्या हवी
इयत्ता सहावी ते आठवीमध्ये दोन वर्ग असल्यास ७० पटसंख्येपर्यंत दोन शिक्षक आणि त्यापुढे ८८ पटसंख्येनंतर तिसरा शिक्षक मान्य होणार आहे. त्यानंतर शिक्षक मान्य करण्यासाठी प्रत्येकी ३५ विद्यार्थ्यांमागे शिक्षक मिळणार आहे. इयत्ता सहावी ते आठवीसाठी नवीन शिक्षक पात्र होण्यास किमान संख्येपेक्षा १८ विद्यार्थ्यांची पटसंख्या असणे आवश्यक आहे. मुख्याध्यापक पद पात्र होण्यासाठी इयत्ता पहिली ते पाचवी किंवा इयत्ता पहिली ते सातवी, आठवीची पटसंख्या किमान १५० असावी लागणार आहे.
नव्या संचमान्यतेच्या निकषाची पूर्तता नवीन शैक्षणिक वर्षापासून होणार आहे. त्यादृष्टीने प्रशासकीय कामकाज सुरू आहेत. पटसंख्येचे पाळले जातील.
- वर्षा बेले, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि. प. भंडारा