बहिणीच्या मारेकऱ्याचा जामीन घेतल्याचा वचपा; गळ्यावर सपासप वार करत बांधकाम ठेकेदाराचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2022 12:06 PM2022-08-05T12:06:18+5:302022-08-05T13:12:41+5:30
मेंढातील घटना, अर्ध्या तासात आरोपींना अटक
भंडारा : बहिणीच्या खून प्रकरणात अटकेतील जावयाचा जामिन घेतल्याने गळ्यावर चाकुचे वार करुन बांधकाम ठेकेदार असलेल्या बहिणीच्या दिराचा निघृण खून करण्याची घटना भंडारा शहरातील मेंढा परिसरात गुरुवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी भंडारा शहर पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासात दोन्ही आरोपींना अटक केली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली.
ओमप्रकाश धनराज मेश्राम (३४) रा.पांढराबोडी, ता. भंडारा असे मृताचे नाव आहे. तर कृष्णा रामदास चापरे (२५) आणि राकेश महादेव मंदुरकर (२७) रा.नेहरु वाॅर्ड भंडारा अशी आरोपींची नावे आहेत. दहा महिन्यापूर्वी कृष्णा चापरे याची बहिण बबिता विलास मेश्राम हिचा गळा आवळून खून करण्यात आला होता. त्यावेळी पोलिसांनी तिचा पती विलास धनराज मेश्राम याला अटक केली. अटकेतील भावाची जामिन घेण्यासाठी ओमप्रकाश मेश्राम प्रयत्न करीत होता. काही दिवसापूर्वी त्याच्याच प्रयत्नातून विलास जामीनावर सुटला.
आपल्या बहिणीच्या मारेकऱ्याचा जामीन घेणाऱ्या ओमप्रकाशचा काटा काढण्याचे या दोघांनी ठरविले. गुरुवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास मेंढा परिसरातील भृशुंड गणेश मंदिरामागील परिसरात ओमप्रकाश दिसताच त्याच्यावर चाकुने सपासप वार केले. गळ्यावर वार होताच ओमप्रकाश रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. या घटनेची माहिती होताच भंडारा शहर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमी अवस्थेत ओमप्रकाशला रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
ओमप्रकाश मेश्राम हा बांधकाम ठेकेदार म्हणून काम करीत होता. मनमिळावू स्वभावाचा तो परिसरात परिचितही होता. मात्र गुरुवारी त्याचा खून झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
अवघ्या अर्ध्या तासात दोन्ही आरोपी जेरबंद
ओमप्रकाशचा खून करुन वैनगंगा नदीच्या दिशेने आरोपी कृष्णा व राकेश पसार झाले. याची कुणकुण भंडारा शहर पोलिसांना लागताच त्यांनी पाठलाग करुन अवघ्या अर्ध्या तासात नदीपरिसरात लपून असलेल्या दोन्ही आरोपींना अटक केली. ही कारवाई भंडारा शहरचे ठाणेदार सुभाष बारसे यांच्या मार्गदर्शनात डीबी शाखेचे पोलीस निरीक्षक निखिल राहाटे, हवालदार बलराम वरकडे, अजय कुकडे, नरेंद्र झलके, हिरा लांडगे यांनी केली. दोन्ही आरोपींना अटक करुन त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.