कर्ज कसे चुकवायचे या विवंचनेतून धोतराने गळफास लावून शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2022 08:04 PM2022-02-02T20:04:02+5:302022-02-02T20:04:42+5:30
Bhandara News कर्जबाजारीपणाने त्रस्त असलेल्या एका वृद्ध शेतकऱ्याने धोतराने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना लाखनी तालुक्यातील लाखोरी येथे बुधवारी दुपारी १ च्या सुमारास उघडकीस आली.
भंडारा: कर्जबाजारीपणाने त्रस्त असलेल्या एका वृद्ध शेतकऱ्याने धोतराने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना लाखनी तालुक्यातील लाखोरी येथे बुधवारी दुपारी १ च्या सुमारास उघडकीस आली..
मुंशी धोंडू बुराडे (७०) असे मृताचे नाव आहे. त्यांच्यावर सोसायटीचे चाळीस हजार रुपये कर्ज होते. घरकूल बांधकामासाठी त्यांनी उसनवार पैसे घेतले होते. शेतात पिकलेले धान शासकीय आधारभूत केंद्रावर विकले होते. मात्र चुकारे अद्यापही मिळाले नाही. घेतलेले कर्ज कसे फेडावे या विवंचनेत ते होते. बुधवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे शेतात गेले. त्यानंतर दुपारी १ वाजताच्या सुमारास त्यांची पत्नी भागरथा बुराडे शेतात गेल्या तेव्हा मुंशी बुराडे हे एका झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले असा परिवार आहे.