माजी उपसरपंच असलेल्या शेतकऱ्याची कर्जासाठी आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 02:21 PM2023-07-21T14:21:03+5:302023-07-21T14:21:46+5:30
लाखांदूर तालुक्यातील मोहरणा येथील घटना
गोपालकृष्ण मांडवकर
भंडारा : मागील खरिपात शेत शिवारात विविध पीक लागवडीसाठी घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीच्या विवंचनेत असलेल्या ५५ वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २१ जुलै रोजी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास तालुक्यातील मोहरणा येथे ऊघडकीस आली आहे. बबन सोमा नागोसे (५५, मोहरणा) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. यापूवरई ते गावचे उपसरपंचही राहिले आहेत.
पोलीस सुत्रानुसार, घटनेतील मृत शेतकऱ्याची मोहरणा येथील शेत शिवारात जवळपास २ एकर शेत जमीन आहे. मागील वर्षीच्या खरीप हंगामात शेतात पिकांची लागवड करण्यासाठी त्यांनी स्थानिक सेवा सहकारी संस्थेअंतर्गत जवळपास ७० हजार रुपये कर्जाची उचल केली होती. मात्र धानाचे उत्पादन कमी झाल्याने कर्जाची परतफेड करता आली नाही. यामुळे मागील काही दिवसांपासून ते चिंताग्रस्त होत, अशी माहिती आहे. सकाळच्या सुमारास घरातील सर्व कुटुंबीय शेतीच्या कामासाठी शेतशिवारात गेले असता, बबन यांनी घरातील छताच्या पंख्याला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
त्यांचे मोठे भाऊ त्यांच्या घरी गेले असता हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना मिळताच ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक अरविंदकुमार जगणे, हवालदार विलास मातेरे, अंमलदार टेकचंद बुरडे आदी पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.
यापूर्वी कर्ज परतफेडीसाठी विकली होती शेती
बबन नागोसे हे वडिलोपार्जित शेती करायचे. शेतीतून येणाऱ्या मिळकतीतून ते प्रपंच चालवीत होते. शेती व्यतिरिक्त त्यांच्याकडे कुठलाही उत्पन्नाचे दुसरे साधन नसल्याने ते नेहमी पीक लागवडीसाठी कर्जाची उचल करीत होते. २ वर्षांपूर्वी त्यांनी कर्ज परतफेड करण्यासाठी मालकी शेतजमीन विकावी लागली होती, अशी माहिती आहे. मागील पंचवार्षिकमध्ये ते गावचे उपसरपंचही होते, हे विशेष !