बकऱ्या चारायला गेलेला शेतकरी वाघाच्या हल्ल्यात ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 02:27 PM2023-06-24T14:27:15+5:302023-06-24T14:28:11+5:30
संतप्त गावकऱ्यांकडून मृतदेह उचलण्यास वन विभागाला विरोध
पवनी (भंडारा) : पवनी तालुक्यातील पवनी ते ब्रह्मपुरी रोडवरील गुडेगाव येथील राखीव वनक्षेत्रालगतच्या शेताच्या बांधावर बसून बकऱ्या चारत असलेल्या सुधाकर सीताराम कांबळे (४२, गुडेगाव) याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी २.३० वाजेदरम्यान घडली. दरम्यान, पंचनामा करण्यासाठी आलेल्या वन विभागाच्या पथकाला गावकऱ्यांनी मृतदेह उचलण्यास मज्जाव केला. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, नंतर ते निवळले.
हे घटनास्थळ राखीव वनक्षेत्र क्रमांक २३८ जवळ आहे. गावालगतच्या शेतशिवार व संरक्षित वनाच्या सीमेपासून साधारणतः २०० मीटर अंतरावर नेहमीप्रमाणे सुधाकर बकऱ्या चारायला गेला होता. बकऱ्या झाडांचा पालापाचोळा खात होत्या व सुधाकर शेजारी शेताच्या बांधावर बसलेला होता. याचदरम्यान भ्रमंती करीत असलेल्या वाघाने भक्ष्य समजून सुधाकरवर हल्ला केला. मान जबड्यात पकडून बऱ्याच अंतरावर त्याला फरफटत नेले. यात गंभीर जखमी झाल्यामुळे घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला.
घरकुलात राहणेही नव्हते नशिबात
घरकुल योजनेंतर्गत मंजूर झालेल्या त्याच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने मजुरांना देण्यासाठी त्याने सकाळी आधार कार्डच्या साहाय्याने खात्यात असलेली रक्कम विड्राल केली. नंतर तो बकऱ्या चारायला घेऊन गेला. मात्र, घरकुलात राहण्याचे भाग्य त्याच्या नशिबी नव्हते. दीड-दोन तासांतच वाघाने त्याच्यावर हल्ला केल्याची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली. यानंतर अख्खा गावच घटनास्थळी पोहोचला.
पिंजरा लावण्याच्या आश्वासनानंतर गावकरी शांत
मागील तीन वर्षांत वाघाच्या हल्ल्यात जीव जाण्याची या परिसरातील ही तिसरी घटना आहे. यामुळे गावकरी संतप्त होते. पंचनाम्यासाठी आलेल्या पथकाचे वाहन गावकऱ्यांनी रोखून धरले. आधी वाघाला जेरबंद करा, तेव्हाच मृतदेह हलवा, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली. दरम्यान, सावरला येथून पिंजरा आणून वाघाला जेरबंद करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पवनीला घेऊन जाण्यास परवानगी दिली.