धान पिकाची बांधणी करणाऱ्या शेतकरी महिलेवर बिबट्याचा हल्ला

By गोपालकृष्ण मांडवकर | Published: October 30, 2023 04:03 PM2023-10-30T16:03:04+5:302023-10-30T16:04:26+5:30

रुग्णालयात उपचार सुरू : मांढळ शेतशिवारातील घटना

A leopard attacked a farmer woman who was planting paddy | धान पिकाची बांधणी करणाऱ्या शेतकरी महिलेवर बिबट्याचा हल्ला

धान पिकाची बांधणी करणाऱ्या शेतकरी महिलेवर बिबट्याचा हल्ला

भंडारा : खरिपातील लागवडीखालील धान पिकाची कापणी करून बांधणी करत असताना शेतशिवारात दडी मारून बसलेल्या बिबट्याने महिला शेतकऱ्यावर हल्ला चढवून जखमी केल्याची घटना घडली. ही घटना सोमवारी, ३० ऑक्टोबर रोजी १२ वाजताच्या सुमारास मांढळ शेतशिवारात घडली. ज्योती ज्ञानेश्वर मुद्दलकर (३८, मांढळ) असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी महिलेचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, घटनेतील जखमी महिला ज्योती यांची मांढळ शेतशिवारात मालकी शेत जमीन आहे. यंदाच्या खरिपात त्यांनी मालकी शेत जमिनीत धान पिकाची लागवड केली होती. शेतात लागवडीखालील धान पीक कापणी योग्य झाल्याने घटनेच्या दिवशी ज्योती, तिचा पती ज्ञानेश्वर व मजूर शेतशिवारात उपस्थित होता.

दरम्यान, शिकारीच्या शोधात जंगलातून शेत शिवारात भटकलेल्या बिबट्याने शेत शिवारात धानाची बांधणी करीत असलेल्या ज्योतीवर हल्ला चढविला. यात बिबट्याने महिलेच्या डाव्या पायाच्या मांडीचा लचका तोडला. शेतशिवारातील अन्य शेतकऱ्यांसह शेतमजुरांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड करून बिबट्याला हुसकावून लावीत जखमी महिलेला उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. लाखांदूरचे वनपरिक्षेत्राधिकारी रुपेश गावित यांच्या नेतृत्वात वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. जखमी महिलेवर लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Web Title: A leopard attacked a farmer woman who was planting paddy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.