पोल्ट्री फार्ममध्ये बिबट्या शिरला, अन् ६०० कोंबड्यांचा बळी घेतला !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 03:41 PM2024-07-19T15:41:42+5:302024-07-19T15:42:27+5:30

एक मेंढीही केली फस्त : केसलवाडा हद्दीतील तेलपेंधारी वनक्षेत्रातील घटना

A leopard entered the poultry farm and killed 600 chickens! | पोल्ट्री फार्ममध्ये बिबट्या शिरला, अन् ६०० कोंबड्यांचा बळी घेतला !

A leopard entered the poultry farm and killed 600 chickens!

विशाल रणदिवे
लोकमत न्यूज नेटवर्क 
अड्याळ :
अड्याळ वनपरिक्षेत्राअंतर्गत केसलवाडा बीट येथील गट क्रमांक १०६ येथील तेलपेंधारी संकुलातील पोल्ट्री फार्ममध्ये बिबट्याने घुसून गुरुवारी पहाटे ६०० कोंबड्यांना ठार केले. त्यापूर्वी दुपारी बिबट्याने एका मेंढीलाही शिकार बनवले. या घटनेने पोल्ट्री फार्म चालकाचे मोठे नुकसान झाले. या घटनेमुळे परिसरामध्ये बिबट्याची भीती आहे.

माहितीनुसार, मध्यरात्रीनंतर गुरुवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास केसलवाडा येथील रहिवासी नागसेन रामटेके यांच्या मालकीच्या सुमन पोल्ट्री फार्मच्या जाळीचा दरवाजा तोडून बिबट्याने आत प्रवेश केला. तिथे उपस्थित असलेल्या ६०० हून अधिक कोंबड्यांना ठार केले. त्यापूर्वी बुधवारी दुपारी बिबट्याने किशोर दिघोरे यांच्या मेंढ्याला चावा घेतला होता. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस येताच  वनपरिक्षेत्र अधिकारी घनश्याम ठोंबरे, वनरक्षक नीलेश श्रीरामे, संदीप भुसारी हे घटनास्थळी पोहोचले. अड्याळ वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या अड्याळ, चकारा, चिचाळ या गावांच्या परिसरात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या असल्याचे सांगण्यात आले. पाळीव जनावरे आणि शेतकऱ्यांवर बिबट्या हल्ला करीत असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. वनविभागाने बिबट्या व इतर वन्यप्राण्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी व नागरिकांनी केली आहे.

घटनास्थळी आढळले बछड्याचेही पगमार्क
घटनास्थळी बिबट्याचे पगमार्क आढळून आले. एक पगमार्क लहान आणि एक मोठा असल्याने पोल्ट्री फार्मवर दोन बिबट्यांनी हल्ला केल्याचा अंदाज आहे. यात मोठा बिबट असून ती मादी असावी. तसेच तिचा एक बछडा असल्याचा कयासही व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, आज दुपारी पोल्ट्री फार्मबाहेर एक ट्रॅप कमेरा लावण्यात आला आहे.


"घटनास्थळी पाहणी केली असता दोन बिबट्यांचे पगमार्क पोल्ट्री फार्म हाऊसच्या सभोवताल व आतमध्ये आढळून आले आहेत. असा प्रकार हद्दीत पहिल्यांदाच घडला आहे. त्या ठिकाणी ट्रॅप केमेरे लावण्यात आले असून पेट्रोलिंग सुरू आहे."

- घनश्याम ठोंबरे, वनपरिक्षेत्र अधिकारी, अड्याळ



 

Web Title: A leopard entered the poultry farm and killed 600 chickens!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.