शिकारीच्या शोधात बिबट्या पडला विहिरीत; साडेपाच तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर काढले बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 04:47 PM2023-03-09T16:47:58+5:302023-03-09T16:48:19+5:30
लाखांदूर वन विभागाची कामगिरी
लाखांदूर (भंडारा) : रात्री शिकारीच्या शोधात जंगलातून शेतशिवारात आलेला एक बिबट शेतातील विहिरीत पडला. ही घटना ७ मार्चला सकाळी ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. त्यानंतर वन विभागाच्या पथकाने तातडीने बचावकार्य करून बिबट्याला पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर काढले.
सरांडी (बु.) येथील रमेश गणपत राऊत या शेतकऱ्याच्या शेतामध्ये ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच लाखांदूरचे वन परिक्षेत्र अधिकारी रुपेश गावित यांच्या नेतृत्त्वात वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. विहिरीत पडलेला बिबट जिवंत असल्याची खात्री होताच गावित यांनी साकोलीचे सहायक वन संरक्षक रोशन राठोड यांना माहिती देऊन वन्यजीव बचाव पथकाची मागणी केली. पथकाने घटनास्थळी दाखल होऊन पिंजऱ्याच्या सहाय्याने जवळपास ६० फूट खोल विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढले.
लाखांदूर वनविभाग व गोंदिया वन विभागाच्या वन्यजीव बचाव पथकाने ही कामगिरी पार पाडली. क्षेत्र सहायक आय. जी. निर्वाण, ठाणेदार रमाकांत कोकाटे, वनरक्षक जी. डी. हात्ते, आर. ए. मेश्राम, पी. बी. पाटील, डी. एस. झोडे, पोलिस नायक सतीश सिंगनजुडे, मिलिंद बोरकर, डोलीराम भोयर, पोलिस शिपाई जयेश जवंजारकर, दीपक भुरले, वाहनचालक टेकाम, प्रफुल राऊत, वनमजूर नाकाडे, विकास भुते, भास्कर आंबेडारे, दिगांबर शहारे, पुरुषोत्तम शहारे, सर्पमित्र जागेश्वर कांबळे, आकाश तिघरे, नामदेव मेश्राम, शत्रुघ्न वैद्य, एकांश चव्हाण आदींनी ही कारवाई पार पाडली.
नागरिकांची तोबा गर्दी
विहिरीत पडलेल्या बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यामुळे बचाव पथकाला रेस्क्यू ऑपरेशन राबविताना अडचण होत होती. लाखांदूरचे ठाणेदार रमाकांत कोकाटे यांनी बंदोबस्त ठेवून गर्दीला पिटाळले. बिबट्याला विहिरीतून जिवंत बाहेर काढल्यावर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.