ट्रकच्या धडकेत जखमी बिबट्याचा रेस्क्युसाठी गेलेल्या वनरक्षकावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2022 11:59 AM2022-07-27T11:59:23+5:302022-07-27T12:00:11+5:30
शिकारीचा पाठलाग करताना झाला होता जखमी
साकोली (भंडारा) : शिकारीचा पाठलाग करीत राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना भरधाव ट्रकच्या धडकेत मादी बिबट्या जखमी झाला. त्यानंतर रेस्क्युसाठी गेलेल्या वनरक्षकाला त्याने हल्ला करून जखमी केले. जखमी अवस्थेततच बिबट्या जंगलात पसार झाला. ही घटना साकोली तालुक्यातील मोहघाटा जंगल परिसरातील महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या रोपवाटिकेजवळ मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली.
मोहघाटा परिसरातील जंगल नागझिरा व्याघ्र क्षेत्रातील वन्यजीव भ्रमंतीचा मार्ग आहे. मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास एक बिबट्या वानरांच्या टोळीचा पाठलाग करीत होता. त्यावेळी मोहघाटा जंगलातून राष्ट्रीय महामार्ग पार करताना एका ट्रकची धडक बिबट्याला लागली. त्यात तो खाली कोसळला. या घटनेची माहिती वनविभागाला होताच लाखनी रेंजचे वनपरिक्षेत्राधिकारी सूरज गोखले, क्षेत्र सहायक एच. बी. ऊके, वनरक्षक कृष्णा सानप व साकोली आणि लाखनी येथील बचाव पथक घटनास्थळावर पोहोचले.
बिबट्या रस्त्यावर निपचित पडून असल्याने तो मरण पावला असावा, असे बचाव पथकाला वाटले. मात्र काही वेळातच बिबट्या अचानक उभा झाला आणि जंगलाच्या दिशेने निघाला. त्याला शोधण्यासाठी वनरक्षक कृष्णा सानप आणि सहायक वनरक्षक राठोड जंगलाच्या दिशेने गेले. त्यावेळी बिबट्या त्यांना दिसला. मात्र या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. कृष्णा सानपचा पाय जबड्यात पकडला. प्रसंगावधान राखून राठोड यांनी काठीने बिबट्याला मारून हुसकावून लावले. तब्बल १५ मिनिटे ही झुंज सुरू होती. त्यानंतर बिबट्या जंगलात पसार झाला.
या घटनेची माहिती होताच वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी मोहघाटा जंगलात पोहोचले. सानप यांना उपचारासाठी भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. तेथे उपवनसंरक्षक राहुल गवई यांनी भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.
पाऊस आणि अंधाराने शोधकार्यात अडचण
जखमी बिबट्या वनरक्षकावर हल्ला करून जंगलात पसार झाला. त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न वनविभागाच्या पथकाकडून सुरू आहे. मात्र पाऊस आणि अंधार झाल्याने शोधकार्यात अडचण निर्माण झाली आहे. वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून आहेत.