भीक मागण्यासाठी आला अन् लाखाचे दागीणे घेऊन पसार झाला
By गोपालकृष्ण मांडवकर | Published: February 13, 2024 04:59 PM2024-02-13T16:59:26+5:302024-02-13T17:00:02+5:30
तुमसरातील घरफोडीचा गुन्हा उघड, चंद्रपुरातून आरोपी ताब्यात.
गोपालकृष्ण मांडवकर,भंडारा : घराचे बांधकाम सुरू असल्याने छतावर पाणी मारत असताना खुल्या घरातून सोन्याचांदीचा ऐवज व रोकड असा १ लाख २८ हजार रूपयांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना १५ जानेवारीला तुमसर (जि. भंडारा) येथे घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी मोठ्या शिताफीने या चोरीचा तपास करीत आरोपीला चंद्रपूर पोलिसांकडून ताब्यात घेतले आहे. राम दयाल मानसिंग मोदी (३५, अमदा, खरसावा झारखंड) असे त्याचे नाव आहे.
गिरीधर येरणे (श्रीरामनगर) यांच्या बहिणीच्या घराचे बांधकाम सुरू असताना त्या छतावर पाणी मारण्यासाठी गेल्या. यावेळी चोरट्याने भिक मागण्याच्या बहाणा करीत घरात प्रवेश केला. यात ३ हजार रुपये रोख व सोन्याचांदीचे दागिणे असा १ लाख २८ हजारांचा ऐवज चोरून नेला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. प्रत्यक्षदर्शी साक्षिदारांनी सांगितल्याप्रमाणे रेल्व स्टेशन देव्हाडी, तिरोडा, गोंदीया, कामठी, इतवारी, नागपूर भागातील रेल्वे स्टेशनवरील सीसीटिव्ही फुटेज तपासून त्याचा शोध घेतला असता अन्य गुन्ह्यामध्ये तो चंद्रपूर पोलिसांच्या ताब्यात असल्याचे समजले. त्यामुळे तुमसरमधील पोलिसांच्या पथकाने चंद्रपुरात जावून त्याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून चोरीला गेलेला माल हस्तगत करून कारागृहात रवानगी करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधीक्षक लोहित मतानी, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे, साहाय्यक पोलिस अधीक्षक रश्मीता राव यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक निलेश ब्राह्मणे, सहाय्यक फौजदार धर्मेंद्र बोरकर, यांच्यासह मार्कंड डोरले, नितीन झंझाड, परीमल मुलकलवार, राजकुमार गिऱ्हेपुंजे यांनी पार पाडून गुन्ह्याची उकल केली.
भीक मागण्याच्या बहाण्याने आला होता दारात :
आरोपी राम दयाल मानसिंग मोदी हा भिक मागण्याच्या बहाण्याने आपल्या ५-६ वर्षाच्या मुला-मुलींना घेऊन दारात आला होता. घरातील व्यक्ती पाणी मारण्यासाठी छतावर गेल्याची संधी साधून त्याने मुलांना बाहेर ठेवून घरात प्रवेश केला. घरातील सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम घेऊन पळ काढला. या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली होती.
आरोपी आहे झारखंडचा :
आरोपीची अधिक चौकशी केली असता तो भटक्या जमातीचा असून झारखंड राज्यातील आहे. मुलांना सोबत घेऊन भीक्षा मागण्याच्या बहाण्याने तो फिरत असतो. अलिकडे तो वर्धा येथे झोपड्या व डेरे टाकून आपल्या सहकाऱ्यांसह राहत असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली होती.