धावत्या दुचाकीवर माकडाची उडी; रस्त्यावर पडून ग्रामसेविका गंभीर
By गोपालकृष्ण मांडवकर | Published: May 28, 2024 02:42 PM2024-05-28T14:42:00+5:302024-05-28T14:43:19+5:30
नागपुरात उपचार सुरू : तुमसर-देव्हाडी मार्गावरील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : तुमसर -देव्हाडी मार्गे सुकळी (दे.) येथे कर्तव्यावर जाणाऱ्या महिला ग्रामसेविकेच्या धावत्या दुचाकीवर माकडाने झाडावरून उडी घेतली. यामुळे तोल गेल्यामुळे रस्त्यावर पडून ग्रामसेविका गंभीर जखमी झाल्या. आसमा रगडे (३२, तुमसर) असे त्यांनी नाव असून ही घटना फादर ऐग्नल शाळेजवळ सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. त्यांना नागपुरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आसमा रगडे या सुकळी (दे.) ग्रामपंचायतीत ग्रामसेवक या पदावर कार्यरत आहेत. त्या नेहमीप्रमाणे आपल्या दुचाकीने सकाळी अकरा वाजता तुमसर-देव्हाडी मार्गे सुकळी येथे कर्तव्यावर निघाल्या होत्या. दरम्यान, अचानकपणे त्यांच्या धावत्या दुचाकीवर माकडाने झाडावरून उडी मारली. अकस्मात बसलेल्या धक्क्याने तोल जावून त्या रस्त्यावरच वाहनासह पडल्या. यात त्या गंभीर जखमी झाल्याने उपचारार्थ तुमसर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याना येथील डाॅक्टरानी नागपूर येथील रुग्णालयात रेफर केले. सध्या त्यांच्यावर नागपुरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर घटनेची नोंद तुमसर पोलिसात करण्यात आली आहे. या प्रकारामुळे वाहनचालकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.