ओव्हरटेक करताना मोपेड ट्रकला धडकली; एक ठार दुसरा गंभीर जखमी
By गोपालकृष्ण मांडवकर | Published: April 2, 2024 05:55 PM2024-04-02T17:55:06+5:302024-04-02T17:55:45+5:30
अतुल गुर्वे व राम गुर्वे हे दोघेही मोपेडने (एम. एच.३६ ए.एम.१४२०) सिहोराकडे जात होते.
भंडारा : तुमसर-बालाघाट या राष्ट्रीय महामार्गावर डोंगराला शिवारातील माऊली पेट्रोल पंपसमोर ओव्हरटेक करण्याच्या नादात भरधाव मोपेड ट्रकला धडकली. या अपघातात एकाचा उपचारादरम्यान तुमसर येथे रुग्णालयात मृत्यू झाला तर, दुसरा गंभीर जखमी झाला. जखमीला भंडारा येथे रेफर करण्यात आले. हा अपघात मंगळवारी सकाळी १०.३० च्या सुमारास घडला. अतुल गुर्वे (३०, शहर वॉर्ड तुमसर) असे मृताचे, तर राम गुर्वे (३३, नवरगाव) असे जखमीचे नाव आहे.
अतुल गुर्वे व राम गुर्वे हे दोघेही मोपेडने (एम. एच.३६ ए.एम.१४२०) सिहोराकडे जात होते. त्यांच्या दुचाकी समोर ट्रक (एच.आर. ३८ यू ०४०५) होता. दुचाकी ओव्हरटेक करण्याच्या नादात अनियंत्रित होऊन समोरील ट्रकला धडकली. त्यात दुचाकीचा हँडल ट्रकच्या मागच्या भागात फसला, त्यामुळे दुचाकी काही अंतरावर फरफटत गेली. त्यात अतुल गुर्वे व राम गुर्वे हे गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी दोन्ही जखमींना तुमसर येथील सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यात उपचारादरम्यान अतुल गुरवे याचा मृत्यू झाला.
पोलिसांना नागरिकांकडून या अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलिस राकेश पटले सहकाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करून जखमींना रुग्णालयात घेऊन गेले. या अपघाताचा तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल कोल्हे करीत आहेत.
राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे जीवघेणे
तुमसर-बालाघाट या राज्य मार्गाचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गात करण्यात आले आहे. हा मार्ग अपघातग्रस्त ठरला असून या मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले असून ते वाचविण्याच्या प्रयत्नात या राष्ट्रीय महामार्गावर अनेकांना अपघातात जीव गमवावा लागला आहे. मागील एक वर्षापासून राष्ट्रीय महामार्गाची घोषणा झाली. परंतु अजूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात दिसत नाही.