अन् अवघ्या अर्ध्या तासात पाॅझिटिव्ह व्यक्ती निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2022 01:14 PM2022-02-01T13:14:13+5:302022-02-01T13:33:40+5:30
एका सेवानिवृत्त शिक्षकाला अवघ्या अर्ध्या तासात दाेन वेगवेगळे काेराेना रिपाेर्ट मिळाले. यात पहिला पाॅझिटिव्ह, तर दुसरा निगेटिव्ह रिपोर्ट मिळाली. ही तफावत पाहून त्यांना चांगलाच मनस्ताप झाला.
इंद्रपाल कटकवार
भंडारा : काेराेना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेत पाॅझिटिव्ह आलेला व्यक्ती बरा हाेण्यास किमान सात दिवस लागतात. मात्र, साेमवारी एका सेवानिवृत्त शिक्षकाला धक्कादायक अनुभव आला. अवघ्या अर्ध्या तासातच पाॅझिटिव्ह रिपाेर्ट निगेटिव्ह झाला. दाेन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या चाचणीतील ही तफावत पाहून चांगलाच मनस्ताप झाला. आता काेणती चाचणी खरी मानायची, असा संभ्रम त्यांच्यापुढे निर्माण झाला.
भंडारालगतच्या बेला येथील सेवानिवृत्त शिक्षक चिंतामण यावलकर यांना सर्दी, खाेकल्याचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांनी साेमवारी थेट जिल्हा रुग्णालय गाठले. आरटीपीसीआर केंद्रात जाऊन काेराेना चाचणी करायचे आहे असे सांगितले. आरटीपीसीआर टेस्ट बंद असल्याचे उत्तर मिळाले. त्यामुळे त्यांनी अँटिजन चाचणी करण्याचा निर्णय घेतला.
साेमवारी ११.४५ वाजता काेराेनाची अँटिजन चाचणी केली. त्यात त्यांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. त्यानंतर काेराेनासाठी मिळणारी औषधी घेण्यासाठी काॅलेज मार्गावरील अल्पसंख्याक वसतिगृहात आले. त्या ठिकाणीही काेराेना चाचणी सुरू हाेती. त्यांच्या मनात काय आले त्यांनी अल्पसंख्याक वसतिगृहातही टेस्ट करून घेतली. काही वेळात रिपाेर्ट आला ताे निगेटिव्ह. त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला.
अवघ्या अर्ध्या तासात काेराेना पाॅझिटिव्हचा त्यांचा रिपाेर्ट निगेटिव्ह आला. त्यावेळी त्यांच्यापुढे विविध प्रश्न उपस्थित झाले. आपण नेमके पाॅझिटिव्ह आहे की निगेटिव्ह, औषधी घ्यायची की नाही, गृहविलगीकरणात राहायचे की रुग्णालयात दाखल राहायचे असे एक ना अनेक प्रश्न त्यांना सतावू लागले. तेथे उपस्थित असलेल्या काहीजणांकडे चाैकशी करूनही पाहिली. त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही.
अखेर त्यांनी आपले गाव गाठले. काेराेना टेस्ट पाॅझिटिव्ह असाे की निगेटिव्ह असे म्हणत त्यांनी स्वत:ला गृहविलगीकरणात ठेवून घेतले आहे. एका सेवानिवृत्त शिक्षकाला हा मनस्ताप कुणाच्या चुकीमुळे हाेत आहे, हे कळायला मार्ग नाही.
दाेन डाेससह बूस्टर डाेसही घेतला
चिंतामण यावलकर सेवानिवृत्त शिक्षक आहे. त्यामुळे त्यांनी सुरुवातीलाच काेराेनाचे दाेनही डाेस घेतले आहे. सहव्याधी असल्याने त्यांनी नुकताच काेराेनाचा बूस्टर डाेसही घेतला आहे. मात्र सर्दी, खाेकला झाल्याने ते रुग्णालयात गेले आणि दाेन रिपाेर्टसह मनस्ताप घेऊन घरी पाेहाेचले.
पहिल्या रिपोर्टनुसारच अहवाल
अवघ्या अर्ध्या तासात दाेन वेगवेगळे काेराेना रिपाेर्ट आले. पहिला पाॅझिटिव्ह, तर दुसरा निगेटिव्ह आढळून आला. त्यामुळे आता नेमका काेणता अहवाल खरा मानायचा, असा प्रश्न आहे. वैद्यकीय सूत्रांशी संपर्क साधला असता पहिला अहवाल पाॅझिटिव्ह असल्याने ताे व्यक्ती पाॅझिटिव्हच राहील. त्याची तशी नाेंदही घेतली जाईल, असे सांगितले.
साेमवारी काेराेना चाचणी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात गेलाे. तेथे टेस्ट पाॅझिटिव्ह आली. औषधीसाठी अल्पसंख्याक वसतिगृहात पाेहाेचलाे. तेथे टेस्ट केली तर निगेटिव्ह आली. दाेन वेगवेगळे रिपाेर्ट हाती आले. आता काेणत्या तपासणीवर विश्वास ठेवायचा हा सामान्य नागरिकांच्या आराेग्याशी खेळ तर नव्हे ना.
- चिंतामण यावलकर, वरिष्ठ नागरिक
रॅपिड ॲन्टिजन तपासणीसाठी घेण्यात आलेल्या नमुन्यात थाेडाफार फरक असावा, त्यामुळे रिपाेर्ट वेगवेगळे आले असावे. परंतु पहिला रिपाेर्ट पाॅझिटिव्ह असल्याने त्यांनी काेराेना नियमावलीचे पालन करावे, असा प्रकार आपल्या जिल्ह्यात पहिलांदाच बघितला आहे.
- डाॅ. रियाज फारुखी़, जिल्हा शल्यचिकित्सक, भंडारा