दिवाळी पर्वात पणत्यांतून प्रकाश पेरणारा कुंभार अंधारातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2022 04:19 PM2022-10-22T16:19:33+5:302022-10-22T16:19:52+5:30
वर्षभर मेहनत करूनही उपेक्षिताचे जिणे
मुखरू बागडे
पालांदूर (भंडारा) : दिवाळीच्या पर्वात पणत्यांच्या मिणमिणत्या प्रकाशाने घर उजाळून टाकणारा ग्रामीण कलावंत कुंभार मात्र जगण्यासाठी आजही अंधारातच चाचपडत आहे. परप्रांतीय पणत्यांची क्रेझ वाढल्याने गावकुसात तयार झालेल्या पणत्यांना कुणी विचारेनासे झाले आहे. वर्षभर मेहनत करूनही उपेक्षिताचे जिणे त्यांच्या नशिबी येत आहे.
दिवाळीचा उत्सव सगळीकडेच उत्साही वातावरणात सुरू झालेला आहे. ऐपतीनुसार खरेदी सुद्धा सुरू आहे. दिवाळीचा लख्ख प्रकाश तेवत ठेवण्याकरिता पणत्यांची घरोघरी गरज भासते. लक्ष्मी पूजेच्या दिवशी लक्ष्मी मातेच्या मूर्तीची पूजा केली जाते. खरेदीची सगळीकडे लगबग असताना स्थानिक व्यापाऱ्याला व कारागिराला न विसरता आपल्याच मातीतून हस्तकलेच्या आधारे तयार झालेल्या पणत्या व मूर्ती खरेदी करा, असे आवाहन आता केले जात आहे.
दिवाळी उत्साहाचा व प्रकाशाचा सण. दिवाळी म्हटली की खरेदी आलीच! मात्र आता स्थानिक वस्तूपेक्षा ऑनलाईन आणि परप्रांतीय दिवाळी साहित्याला मागणी वाढली आहे. साध्या पणत्याही कुणी घेताना दिसत नाही. सर्वत्र आकर्षक रंगाने रंगविलेल्या पणत्यांची मागणी वाढत आहे. अशा स्थितीत वर्षभर मेहनत करून चाकावर तयार केलेल्या पणत्यांना ग्राहकच मिळत नाही. शहरी बाजारासह ग्रामीण ठिकाणी रस्त्याच्या कडेला मातीच्या पणत्या घेऊन ग्रामीण कलावंत बसले आहेत. मात्र, ग्राहकांचा ओढा दिसत नाही. पणत्या आणि महालक्ष्मीची मूर्ती विकली गेली नाही तर दिवाळी कशी साजरी करावी असा प्रश्न त्यांच्या पुढे आहे.
प्लास्टर ऑफ पॅरिस अर्थात पीओपीच्या मूर्ती बाजारात विक्रीला येतात. दिसायला सुंदर व कमी किमतीत असतात. मात्र, यातून आपला आनंद हद्दपार होतो. पर्यावरणाशी बेईमानी होते. स्थानिकांचा रोजगार हिरावला जातो. करिता स्थानिक मातीतील मूर्तींना व पणत्यांना दिवाळीच्या पर्वात खरेदी करून उत्साहाचे वातावरण कायम ठेवा, असे आवाहन करण्यात येत आहे.
वडिलोपार्जित हस्तकलेचा आधार घेत मातीतून मूर्ती व पणत्या घडवणे सुरू आहे. पणत्या १० रुपयाला बारा तर २५ ते ५० रुपयापर्यंत लक्ष्मी मातेच्या मूर्ती विकत आहोत. याच्यावरच आमचा उदरनिर्वाह सुरू आहे. मात्र बाजारात पीओपीच्या मूर्ती विक्रीला येत असल्याने आमच्या रोजगारावर टांगती तलवार आहे.
- मोरेश्वर पाथरे, कुंभार काका, पालांदूर.