अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत शाळकरी बालक जखमी
By गोपालकृष्ण मांडवकर | Published: September 14, 2023 12:29 PM2023-09-14T12:29:36+5:302023-09-14T12:30:42+5:30
लाखांदूर-वडसा राष्ट्रीय महामार्गावरील घटना
भंडारा : सकाळच्या सुमारास सायकलने शाळेत जात असलेल्या एका शाळकरी विद्यार्थ्याला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाची धडक बसली. या अपघातात शाळकरी बालक जखमी झाल्याची घटना १४ सप्टेंबर रोजी सकाळी ७:३० वाजताच्या सुमारास लाखांदूर ते वडसा राष्ट्रीय महामार्गावरील मीरा कन्हैय्या मंगल कार्यालय परिसरात घडली. मोहित सुनिल येवले (१४, लाखांदूर) असे जखमी शाळकरी बालकाचे नाव आहे.
गुरूवारी बैल पोळा सण असल्याने शाळा सकाळ पाळीची ठेवली होती. यासाठी मोहित सकाळच्या सुमारास सायकलने शाळेत जाण्यासाठी निघाला होता. मागेहुन भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाची मोहितच्या सायकलला धडक बसली. यात तो रस्त्यावर पडला. अपघात झाल्याचे पाहून अज्ञात चारचाकी वाहनचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. मोहित स्थानिक लाखांदूर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील ईयत्ता ८ व्या वर्गाचा विद्यार्थी आहे.
या अपघाताची माहिती या मार्गावरील प्रवाशांनी जखमी मोहितला उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचार सुरू असून सध्या त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. या अपघाताची माहिती होताच भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रमोद प्रधान, लाखांदूरचे नगरसेवक रज्जू पठाण, डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य शैलेश खोब्रागडे, शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य अर्जुन राठोड, शिक्षक तोषित नाकतोडे, संजय प्रधान यासह आणि शिक्षकांनी रुग्णालयात येऊन भेट घेतली. या अपघाताची नोंद लाखांदूर पोलिसांनी घेतली आहे.