अवजड वाहनाच्या धडकेत सात वर्षीय मादा बिबट जागीच ठार
By युवराज गोमास | Published: July 20, 2023 02:51 PM2023-07-20T14:51:43+5:302023-07-20T14:52:16+5:30
राष्ट्रीय महामार्गावरील गडेगाव डेपो जवळील घटना
भंडारा : महामार्ग ओलांडण्याच्या प्रयत्नात असतांना अज्ञात अवजड वाहनाच्या धडकेत एक सहा ते सात वर्षीय मादा बिबट जागीच ठार झाले. ही घटना बुधवारला (१९ जुलै) रात्री २ ते ३ वाजताचे दरम्यान (मध्यरात्री) भंडारा ते लाखनी दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील गडेगाव डेपो जवळ घडली.
गडेगाव राष्ट्रीय महामार्ग गस्ती पथकांना ही घटना माहित होताच त्यांनी भंडारा वनाधिकाऱ्यांना माहिती दिली. उपवनसंरक्षक राहूल गवई यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलक, भंडारा वनपरिक्षेत्राधिकारी संजय मेंढे यांनी ताबडतोब कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. त्यावेळी मृतक बिबट हा महामार्गावर मृत अवस्थेत दिसून आला. घटनेचा मौका पंचनामा करून मृतक बिबटास तातडीने उचलून गडेगाव डेपो येथे हलविण्यात आले. गुरूवार (२० जुलै) रोजी सकाळी १० वाजताचे सुमारास साकोलीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. गुणवंत भडके, किन्हेरीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. विठ्ठल हटवार व पशुधन विकास अधिकारी डॉ. सुरेश निपाने यांच्या चमूने शवविच्छेन केले. गडेगाव डेपो आगार परिसरात दाह संस्कार करण्यात आले.
यावेळी भंडाराचे सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलक, भंडारा वनपरिक्षेत्राधिकारी संजय मेंढे, काेका येथील वनपाल धारणे, जी. आर. नागदेवे, कवलेवाडाचे वनरक्षक नेवारे, भंडाराचे मानद वन्यजीव रक्षक शाहिद खान, नदीम खान तसेच वनमजूर व कोका वन्यजीव अभयारण्याचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
मृतक मादा बिबटाचे वय सहा ते सात वर्ष होते. जोरदार धडक लागल्याने बिबटच्या कमर व डोक्याला गंभीर इजा झाली व जागीच मृत्यू झाला.
- डॉ. गुणवंत भडके, पशुधन विकास अधिकारी साकोली.
अज्ञात वाहनाने गंभीर धडक मादा बिबटचा जागीच मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मौका पंचनामा करून गडेगाव डेपो परिसरात दाह संस्कार करण्यात आले. पुढील तपास सुरू आहे.
- संजय मेंढे, वनपरिक्षेत्राधिकारी भंडारा.