शिवसैनिकाने रक्ताने लिहिले प्रतिज्ञापत्र; मातोश्रीवर जाऊन दिली पक्षनिष्ठेची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2022 02:44 PM2022-07-29T14:44:21+5:302022-07-29T15:03:24+5:30

आमदार, खासदार सोडून गेले तरी सामान्य शिवसैनिक हातात भगवा झेंडा घेऊन नेटाने उभे आहेत.

A Shiv Sainik wrote an affidavit with blood; Went to Matoshree and gave a pledge of party loyalty | शिवसैनिकाने रक्ताने लिहिले प्रतिज्ञापत्र; मातोश्रीवर जाऊन दिली पक्षनिष्ठेची ग्वाही

शिवसैनिकाने रक्ताने लिहिले प्रतिज्ञापत्र; मातोश्रीवर जाऊन दिली पक्षनिष्ठेची ग्वाही

Next

राहुल भुतांगे

तुमसर (भंडारा) : शिवसेनेत बंड झाल्यानंतर बंडखोरांविरुद्ध सर्वसामान्य शिवसैनिकांमध्ये मोठा रोष निर्माण झाला. आमदार, खासदार पक्षाला सोडून गेले असले तरी आम्ही सामान्य शिवसैनिक शिवसेनेसोबतच आहेत. याचा प्रत्यय तुमसर तालुक्यातील परसवाडा येथील एका कट्टर शिवसैनिकामुळे आला. त्याने चक्क आपल्या रक्ताने प्रतिज्ञापत्र लिहून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर जाऊन दिले. सामान्य शिवसैनिकाचे पक्षप्रेम पाहून खुद्द उद्धव ठाकरेही भारावून गेले.

पवन खवास असे कट्टर शिवसैनिकाचे नाव असून, तो तुमसर तालुक्यातील परसवाडा येथील रहिवासी आहे. युवा सेनेचा पदाधिकारी आहे. शिवसेनेत बंड झाल्यानंतर तो प्रचंड अस्वस्थ झाला. आमदार, खासदार सोडून गेले तरी सामान्य शिवसैनिक हातात भगवा झेंडा घेऊन नेटाने उभे आहेत. पवनने आपल्या रक्ताने पत्र लिहून पक्षनिष्ठा दाखविली. आपले पत्र घेऊन तो मुंबई येथे पोहचला. तेथे मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र दिले. शिवसैनिकाच्या मनात किती पक्षनिष्ठा आहे हे या पत्रातून दिसून येते. या पत्राची आता भंडारा जिल्ह्यात समाजमाध्यमावर चांगलीच चर्चा आहे.

शिवसैनिकच खरी शिवसेना

शिवसेना या चार अक्षरांपासून आम्हा शिवसैनिकांना ओळख मिळाली. आजही आम्ही तन-मन-धनाने उद्धव ठाकरे व शिवसेनेसोबत आहोत. शिवसेना हे चार अक्षर ज्वलंत ठेवण्यासाठी परिश्रम घेणार आहोत, असा आशावाद पवनने आपल्या रक्ताने लिहिलेल्या प्रतिज्ञापत्रात लिहिले आहे.

मी शिवसेना व शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ माझ्या स्वत:च्या रक्ताने लिहिलेले प्रतिज्ञापत्र एक शिवसैनिक म्हणून सादर केले. शिवसैनिक आजही शिवसेनेसोबतच आहे आणि राहतील.

- पवन खवास, शिवसैनिक, परसवाडा

Web Title: A Shiv Sainik wrote an affidavit with blood; Went to Matoshree and gave a pledge of party loyalty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.