पाच वर्षांत साधी नाली केली नाही, थांबा आता दाखवतोच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2022 10:57 PM2022-11-14T22:57:17+5:302022-11-14T22:57:45+5:30
ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचारापासून रस्ता, नाल्या, पथदिवे अशा बाबींवरून धारेवर धरले जात आहे. मागच्या वेळी मत मागताना मोठा गोड बोलत होता. सिमेंट रस्ता करून देऊ, नाल्याची साफसफाई नियमित करू, नळाला दररोज पाणी येईल, असे सांगत होता. विश्वास ठेवला. मत दिले. आता तुम्हीच सांगा पाच वर्षांत काय केले. दिसते कुठे रस्ता, झाली नाली साफ, अन् चालले पुन्हा मत मागायला, असे शब्द आता रोजच ऐकायला येत आहेत.
ज्ञानेश्वर मुंदे
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भाऊ मेंबरले घरासमोरची नाली दुरुस्त करायला सांगितली. एकदा नाही दहादा सांगितले. सरपंचालाही सांगून बघितले. पाच वर्षांत साधी नाली दुरुस्त केली नाही. आता पुन्हा उभा आहे म्हणतो. थांबा दाखवतोच आता निवडणुकीत, असे संवाद आता गावागावांत ऐकायला येत आहेत. थंडीत शेकोटीवर ग्रामपंचायत निवडणुकीच्या गप्पात सत्ताधाऱ्यांवरील रोष व्यक्त होत आहे. उमेदवारांची जुळवाजुळव करत असलेल्या पुढाऱ्यांना गावकऱ्यांच्या बोलण्याला तोंड द्यावे लागत आहे.
जिल्ह्यातील ३६३ ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरू झाली. गावपुढारी योग्य उमेदवाराच्या शोधात आहेत. काही ठिकाणी उमेदवारांची निवड झाली आहे. विरोधी गटाचा अंदाज घेऊन उमेदवार निश्चित करीत आहेत. दुसरीकडे गावात सध्या निवडणुकीच्याच चर्चा सुरू असून, पाच वर्षांत न झालेल्या कामाचा रोष त्यातून व्यक्त होत आहे. लहानसहान समस्या असल्या तरी त्या सुटल्या नाहीत म्हणून तोंडसुख घेतले जात आहे. ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचारापासून रस्ता, नाल्या, पथदिवे अशा बाबींवरून धारेवर धरले जात आहे.
मागच्या वेळी मत मागताना मोठा गोड बोलत होता. सिमेंट रस्ता करून देऊ, नाल्याची साफसफाई नियमित करू, नळाला दररोज पाणी येईल, असे सांगत होता. विश्वास ठेवला. मत दिले. आता तुम्हीच सांगा पाच वर्षांत काय केले. दिसते कुठे रस्ता, झाली नाली साफ, अन् चालले पुन्हा मत मागायला, असे शब्द आता रोजच ऐकायला येत आहेत. निवडणूक आहे, जाऊ द्या, म्हणून गावपुढारी दुर्लक्ष करीत आहेत.
सरपंचपदाच्या उमेदवारीवरून ओढाताण
- पंचायत राज व्यवस्थेत ग्रामपंचायतीला मोठे महत्त्व आहे. त्यातही सरपंचपद अतिमहत्त्वाचे. प्रत्येक गावात सरपंच होण्यासाठी अनेक जण गुढग्याला बाशिंग बांधून आहेत. गावातील प्रभावी पॅनलकडून लढण्यासाठी प्रयत्न करीत आहे. जमले नाही तर काही झालेले तरी निवडणुकीत उभे राहायचेच, असा निर्धार आहे. त्यामुळे एका सरपंचपदासाठी दहा ते बारा जण उभे राहण्याची शक्यता दिसत आहे.
सुशिक्षित तरुणही उतरले निवडणुकीत
- आपण भले आणि आपले काम भले असे म्हणणारे सुशिक्षित तरुणही आता निवडणुकीत उतरले आहेत. शिक्षण आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी शहरात राहणारे तरुण आता गावात दिसू लागले आहेत. आपल्याच तोऱ्यात राहणारी आणि दुचाकीवरून फिरणारी ही मंडळी आता जमिनीवर आली असून, निवडणुकीत मोठ्या हिरिरीने भाग घेत आहेत.