जिल्ह्यावर कोसळले अस्मानी संकट; तीन शेतमजुरांचा मृत्यू, तीन बकऱ्या ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 01:07 PM2023-07-22T13:07:25+5:302023-07-22T13:10:33+5:30

आर्थिक मदत मिळणे गरजेचे : शेतमजुरांच्या चुली पेटणार तरी कशा?

A sky-high crisis fell on the district; Three farm laborers killed, 25 injured due to lightning strike | जिल्ह्यावर कोसळले अस्मानी संकट; तीन शेतमजुरांचा मृत्यू, तीन बकऱ्या ठार

जिल्ह्यावर कोसळले अस्मानी संकट; तीन शेतमजुरांचा मृत्यू, तीन बकऱ्या ठार

googlenewsNext

भंडारा : शुक्रवारचा दिवस भंडारा जिल्ह्यावर निसर्गाच्या दृष्टीने कोपलेला निघाला. जिल्ह्यात मुसळधार पावसासह कोसळलेल्या विजांमुळे तीनजणांचा मृत्यू झाला, तर २५ शेतमजूर जखमी झाले. अस्मानी व सुलतानी संकटांचा सामना बळीराजा करीतच असतो, मात्र शुक्रवारी शेतमजुरांवरच हे अस्मानी संकट कोपले गेले.

जिल्ह्यात आठवड्याभरापासून पावसाची संततधार सुरू आहे. हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज तंतोतंत खरा ठरला. दोन दिवसांपूर्वी ऑरेंज ॲलर्ट तर २२ जुलैपासून येलो अलर्ट हवामान खात्याने वर्तविला आहे. पुढील दिवस पावसाचे असल्याने मुसळधार पावसासह वीज कोसळण्याची शक्यताही वेधशाळेने वर्तवली आहे. उल्लेखनीय म्हणजे पावसाचा अंदाज प्रत्येक चौघडीला सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात येतो. वीज कोसळण्याच्या बचावापासून उपाययोजनाही सांगण्यात येतात.

खरिपाचा हंगाम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात शेतशिवारात रोवणी सुरू आहे. यातच तालुका तालुक्यात मजुरांची ने-आण सुरू आहे. जवळपासच्या गावांमध्ये मजुरीसाठी शेतमजूर जातात. यातच शुक्रवारी निसर्गानेही डाव साधला. वीज कोसळल्याने तीन शेतमजुरांचा मृत्यू झाला, तर २५ जण जखमी झाले. यात अन्य दोन घटनेतही चार शेळ्यांचा मृत्यू झाला.

जिल्ह्यात सरासरी १० मिमी पाऊस

जिल्ह्यात गत २४ तासात १०.२ मिमी पाऊस बरसल्याची नोंद करण्यात आली. यात भंडारा तालुक्यात ८.३ मिमी, मोहाडी १०.३, तुमसर ८.१, साकोली ४.१, लाखांदूर ८.३ तर लाखनी तालुक्यात १४.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यात १ जूनपासून ते आतापर्यंत सरासरी ३३४.७ मिमी पाऊस बरसला आहे.

गावकऱ्यांची मदत ठरली मोलाची

मोहाडी तालुक्यातील निलज गावात शेतात वीज कोसळून महिला बेशुद्ध पडल्याची माहिती होताच खळबळ उडाली. घटनास्थळ एक किलोमीटर अंतरावर होते. शिवाय पाणंद रस्त्याची अवस्था चिखलामुळे बिकट होती. ट्रॅक्टर नेण्यास अडचणी होत्या. त्यामुळे ग्रामस्थांनी तातडीने बैलबंडीचा वापर केला. तत्काळ जखमींना करडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ हलविले. या सर्व कामासाठी निलज खुर्द येथील ग्रामस्थांची मदत मोलाची ठरली.

प्रशासन व लोकप्रतिनिधी धावले मदतीला

घटनेतील जखमींना तातडीची मदत मिळण्यासाठी निलज येथील सामाजिक कार्यकर्ते युवराज मोहतुरे, करडीचे माजी सरपंच महेंद्र शेंडे यांनी पोलिसांना माहिती दिली. जिल्हा परिषद सदस्य महादेव पचघरे यांनी मोहाडीचे तहसीलदार सुरेश वाघचाैरे, करडीचे ठाणेदार राजेंद्र गायकवाड व तालुका आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांना कळविले. तहसीलदारांनी जखमींची भेट घेत डॉक्टरांकडून परिस्थितीची माहिती जाणून घेतली. करडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पितांबर तलमले यांनी प्रथमोचारानंतर तुमसर व भंडारा येथे पुढील उपचारासाठी रवाना केले.

खोकरल्यात कोसळली वीज, उपकरणे निकामी

भंडारा शहरालगतच्या ग्राम खोकरला येथील लक्ष्मी नगरात शुक्रवारला दुपारी २:४५ वाजताचे दरम्यान वीज कोसळल्याने तीन घरांतील पंखे आणि सेटटॉप बॉक्स निकामी झाले. यामुळे नागरिकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले. शुक्रवारला सकाळपासूनच रिमझिम पावसाची झळ सुरु होती. दुपारच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. दरम्यान, खोकरला येथील लक्ष्मी नगरातील मोबाइल टॉवरजवळ वीज कोसळली. यामुळे टॉवरजवळील भिंत कोसळली. तसेच जगदीश धकाते यांच्या घरातील चार पंखे, रामेश्वर शहारे व गणेश तईकर यांचा टीव्ही सेटटॉप बॉक्स नादुरुस्त झाले. अचानक आवाज करीत वीज कोसळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण संचारले होते.

जिवावर बेतले, बकऱ्यांवर निभावले

तुमसरमधील रनेरा या गावातील शेतशिवारात शुक्रवारी दुपारी वीज पडली. शेतात मजूर धानाची रोवणी करीत होते. बाजुलाच बकऱ्याही चरत होत्या. वीज अगदी डोळ्यादेखत तीन बकऱ्यांवर पडली. त्यात त्यांचा जीव गेला. काम करणाऱ्या मजुरांचे प्राण थोडक्यात बचावले.

निलजमध्ये शोककळा

मोहाडी तालुक्यातील निलज खुर्द या गावातील शेतशिवारात काम करणाऱ्या पाच मजुरांवर वीज पडली. यात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन महिलांना भंडारामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. निलज येथील सुर्यप्रकाश बोंदरे यांच्या शेतात गोंदिया जिल्ह्यातील नवेझरी गावातून महिला मजूर आणून रोवणीचे काम सुरु होते. दुपारी अडीच वाजता जेवनाची वेळ झाल्याने सर्वजण बांधावरील झाडाखाली शिदोरी सोडून जेवायला बसले असतानाच काळाने त्यातील दोघींचा घास घेतला. यामुळे संपूर्ण शेतशिवारात व गावात दुःखाचे सावट पसरले आहे. निलज गावामध्ये घडलेली ही पहिलीच घटना असल्याने या गावावर आणि मजुरांच्या नवेझरी या गावावर शोककळा पसरली आहे.

 

Web Title: A sky-high crisis fell on the district; Three farm laborers killed, 25 injured due to lightning strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.