भंडाऱ्याच्या जवानाचा कुपवाडा येथे अपघाती मृत्यू; वार्ता कळताच कुटुंबावर कोसळले आभाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2022 06:17 PM2022-03-11T18:17:21+5:302022-03-12T11:31:53+5:30
भारतीय सेनादलात असलेल्या भंडारा येथील जवानाचा गुरुवारी (दि. १०) जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात जीपला झालेल्या अपघातात मृत्यू झाला. या अपघाताचे वृत्त गुरुवारी उशिरा रात्री भंडाऱ्यात धडकताच सर्वत्र शाेककळा पसरली.
भंडारा : दीर्घ सुटी संपवून आठवड्याभरापुर्वी सैन्यात कर्तव्यावर रुजू झाला. विलगीकरण केंद्रात जाताना जीपला अपघात झाला. त्यात भंडाऱ्याचा सुपूत्र शहीद झाला. ही वार्ता गुरुवारी रात्री कळताच संपूर्ण कुटुंबावर आभाळ कोसळले. पत्नीसह आई-वडीलांचे अश्रू थांबायला तयार नाही. शुक्रवारी दिवसभर घरासमोर नातेवाईकांची गर्दी आणि सुपूत्राच्या पार्थिवाची प्रतीक्षा सुरु होती.
संदीप उर्फ चंद्रशेखर रुपचंद भोंडे (३४) रा. न्यू ऑफीसर कॉलनी भंडारा कर्तव्या असे मृत जवानाचे नाव आहे. २००८ मध्ये तो २१ महार रेजिमेंटमध्ये दाखल झाला. देश सेवेसाठी तो जम्मू- कश्मीरमध्ये कर्तव्यावर होता. ७५ दिवसांची सुटी घेवून तो भंडारा येथे आला होता. ५ मार्च रोजी तो सर्व कुटुंबियांचा निरोप घेवून आपल्या कर्तव्यावर रुजू झाला.
नागपूर मार्गे दिल्लीला विमानाने आणि तेथून जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचला. गुरुवारी कुपवाडा जिल्ह्यातील गच्छीगण येथून विलगीकरण केंद्राकडे आपल्या सहकाऱ्यासह जीपने जात होता. यावेळी सरकुली येथे अपघात झाला. जीप अनियंत्रीत होवून १२ मीटर खोल दरीत पडली. त्यात चंद्रशेखर यांचा मृत्यू झाला. गुरुवारी रात्री पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेले वडील रुपचंद भोंडे यांना फोन आला. अपघातात चंद्रशेखरची मृत्यू झाल्याचे कळताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.
अवघ्या आठ दिवसापूर्वी गेलेल्या सुपूत्राची अशी वार्ता कानी पडली आणि ते एकदम खालीच बसले. चंद्रशेखरची पत्नी किरणला या दुर्देवी घटनेची माहिती कळताच तिच्यावर आकाश कोसळले. चंद्रशेखरच्या आईच्या डोळ्यातील अश्रू थांबायला तयार नाही. भंडाऱ्यात आपल्या शहरातील तरुण शहीद झाल्याचे कळताच प्रत्येकजण हळहळत होते. नातेवाईकांनी त्याच्या घराकडे धाव घेतली. चंद्रशेखरच्या मागे पत्नी, पाच वर्षाचा मुलगा पारस, आई-वडील, एक भाऊ आणि एक बहीन असा परिवार आहे.
शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
शहीद चंद्रशेखर भोंडे याचे पार्थिव भंडारा येथे आणण्यात येणार असून त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. मात्र पार्थिव शरीर नेमके कधी येणार याची माहिती शुक्रवारी दुपारपर्यंत कुटुंबियांना नव्हती. त्यामुळे ते जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात होते. चंद्रशेखरचे मुळ गाव मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव आहे. अंत्यसंस्कार डोंगरगाव येथे करायचे की भंडाऱ्यात हे चंद्रशेखरचे पार्थिव आल्यानंतर निश्चित होणार असल्याचे भोंडे कुटुंबियांनी सांगितले.