भरधाव दुचाकी खांबावर आदळली; एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2023 00:10 IST2023-09-24T00:10:37+5:302023-09-24T00:10:49+5:30
रामटेक तुमसर राष्ट्रीय महामार्गावरील सालई शिवारातील घटना

भरधाव दुचाकी खांबावर आदळली; एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी
तुमसर (भंडारा) : रामटेक- तुमसर राष्ट्रीय महामार्गावर सालई शिवारात तुमसरकडे गावी येताना भरधाव दुचाकी रस्त्याच्या कडेला खांबावर आढळली. त्यात एका तरुणाच्या मृत्यू झाला तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला गंभीर जखमी तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे. सदर अपघात सालई गाव शिवारात शनिवारी रात्री ८.३० च्या सुमारास घडला. मृतक तरुणाचे नाव शुभम प्रकाश भोयर (२५) राहणार बाम्हणी तालुका तुमसर तर गंभीर जखमी तरुणाचे नाव मयूर प्रल्हाद भोयर (२४) राहणार बाम्हनी असे आहे.
शुभम व मयूर हे दोघेही भावंड काही कामानिमित्त सालई पलीकडील एका गावात गेले होते. रात्री बामणी येथे स्वगावी परत येताना दुचाकी क्रमांक एम. एच.३६ ए. एम.३८३७ एका वाहनाला वाचविताना थेट रस्त्याच्या शेजारी असलेल्या खांबाला भरधाव दुचाकीने धडक दिली. यात शुभम व मयूर गंभीर जखमी झाले. स्थानिकांच्या मदतीने जखमी शुभम व मयूरला तुमसर येथील शासकीय उपजला रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले शुभमची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला डॉक्टरांनी भंडारा येथे रेफर केले.
भंडारा येथे जाताना वाटेत शुभमचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर मयूर यालाही भंडारा येथे रेफर करण्यात सध्या त्याच्यावर भंडारा येथे एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुभम हा देव्हाडी येथील क्लेरिअन ड्रग कंपनीत कार्यरत होता. तीन वर्षांपूर्वी वडिलांच्या तर दोन वर्षांपूर्वी शुभमच्या लहान भावाचा कर्करोगाने मृत्यू झाला होता. शुभम हा आईला एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बाम्हनी गावात शुभमच्या मृत्यूची वार्ता कळताच गावावर शोककळा पसरली आहे.