भर चौकात तुफान राडा; युवकाच्या हत्येनंतर जमावाच्या मारहाणीत हल्लेखोराचाही मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2023 10:28 PM2023-05-29T22:28:46+5:302023-05-29T22:29:11+5:30
Bhandara News क्षुल्लक वादातून लस्सी विक्रेता युवकावर धारदार शस्त्रानं प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना भंडाऱ्यात घडली. यानंतर जमावाच्या मारहाणीत हल्लेखोराचाही मृत्यू झाल्याने या घटनेला गंभीर वळण लागले.
भंडारा : क्षुल्लक वादातून लस्सी विक्रेता युवकावर धारदार शस्त्रानं प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना भंडाऱ्यात घडली. यानंतर जमावाच्या मारहाणीत हल्लेखोराचाही मृत्यू झाल्याने या घटनेला गंभीर वळण लागले. रविवारी रात्री १०:१५ वाजताच्यासुमारास भरचौकात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
शहरातील गांधी चौकात काकाच्या दुर्गा लस्सी सेंटरवर काम करणाऱ्या अमन धीरज नंदूरकर (वय २३) या युवकाची रविवारी रात्री १०:१५ वाजताच्यादरम्यान पोटात चाकू भोसकून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर जमावाने अभिषेक साठवणे या १८ वर्षीय हल्लेखोरास पकडून बेदम मारहाण केली. त्याला रात्रीच नागपूरला उपचारासाठी हलवले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी अमनच्या हत्येत सहभागी असलेल्या विक्रम, विष्णू ऊर्फ बा. वासनिक, साहिल गजानन मालाधरे, अतुल तांडेकर, निशांत रामटेके, अभिषेक साठवणे व अन्य सहकाऱ्यांविरुद्ध कलम ३०२, ३०७, १४४, १४७, १४८, १४३ नुसार गुन्हे नोंदवून साहिल, अतुल आणि निशांत यांना ताब्यात घेतले आहे; तर अभिषेकच्या आईच्या तक्रारीवरून दुसऱ्या गटाविरुद्ध कलम ३०२, १४३, १४७ नुसार गुन्हे दाखल केले आहेत.
घटनेच्या आदल्यादिवशी शनिवारी अमनचे काका किरण नंदूरकर यांच्याशी विक्की मोगरे (आंबेडकर वॉर्ड) याचा वाद झाला होता. अमनलाही मारहाण झाली होती. हे प्रकरण तिथेच मिटले असताना, रविवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास अभिषेक साठवणे आणि इतर युवक लस्सी सेंटरवर आले. कालच्या भांडणाबद्दल कॉम्प्रमाईज करायचे आहे, असे सांगून त्यांची चर्चा सुरू झाली. मात्र समेट न होता उलट वाद वाढत गेला. अमन मध्यस्थी करण्यासाठी गेला असता, अभिषेकने जवळील चाकू काढला आणि त्याच्या पोटात भोसकला. यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. यानंतर अमनचे काका, वडील, मित्रांनी धाव घेऊन अभिषेकला पकडले. जमावाने त्याला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
रुग्णालयात पुन्हा लाथा-बुक्क्यांनी बदडले
अमनला रुग्णालयात उपचारासाठी नेले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. जमावाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या अभिषेकलाही रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. मात्र अमनच्या मृत्यूची बातमी कळताच, जमावाने रुग्णालयातच अभिषेकला पुन्हा लाथा-बुक्क्यांनी बडवून काढले. यामुळे तो गंभीर जखमी झाल्याने पोलिसांच्या बंदोबस्तात त्याला नागपूरला उपचारासाठी रवाना करण्यात आले. मात्र, तिथे उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला.
शहरात तणाव
या घटनेमुळे शहरात रात्री बराच तणाव निर्माण झाला होता. परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने सीआपीएफच्या तुकडीला रात्रीच पाचारण करून चौकात बंदोबस्त लावला होता. सध्या परिस्थिती शांततेत आहे. फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
...