आयुध निर्माणीतील स्फोटप्रकरणी त्री सदस्यीय चौकशी समिती गठीत
By गोपालकृष्ण मांडवकर | Published: January 27, 2024 01:59 PM2024-01-27T13:59:28+5:302024-01-27T13:59:51+5:30
यतीश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
भंडारा : जवळच असलेल्या जवाहर नगर येथील आयुध निर्माणीमध्ये शनिवारी सकाळी झालेल्या स्फोटाच्या आणि कामगाराच्या मृत्यूच्या चौकशीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोर्ड चौकशी समिती गठित केली आहे. दरम्यान, मृत कामगार अविनाश मेश्राम यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी पाठविले आहे.
आयुध निर्माणीचे डेप्युटी जनरल मॅनेजर यतीश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, तातडीने गठित करण्यात आलेल्या बोर्ड कमिटीमध्ये एजीएम मलिक, जॉईंट जीएम पी.व्ही. मडावी आणि जॉईंट वर्कर मॅनेजर पी.पी. गायधने यांचा समावेश आहे. या त्रिसदिशीय समितीने चौकशी सुरू केली असून, त्याचा अहवाल तातडीने वरिष्ठांना दिला जाणार आहे.
यतीश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र सकाळी सव्वा आठ वाजता मोठा ब्लास्ट झाला. त्यानंतर आग लागली. ही आग विझवण्यासाठी तातडीने बचाव पथक पोहोचले असता अविनाश मेश्राम गंभीर जखमी अवस्थेत दिसले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी घटनास्थळीस त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. त्यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून, अहवाल आल्यानंतरच अधिक माहिती कळू शकेल.
मृत कामगार अविनाश मेश्राम यांच्या कुटुंबीयांना तातडीने पेन्शनचा लाभ, कंपन्शन आणि अन्य मदत नियमानुसार दिली जाणार असल्याची माहिती यतीश कुमार यांनी दिली. घटनास्थळ प्रतिबंधित क्षेत्र असून तिथे कोणालाही प्रवेश करण्यास अनुमती नाही. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी आणि जवाहरनगरचे पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
कामगार वसाहतीत शोककळा
मागील 2001 पासून अविनाश मेश्राम आयुध निर्माणीमध्ये रुजू झाले होते. ते मूळचे गोंदिया जिल्ह्यातील अदासा येथील आहेत. सध्या ते मिस्त्री (डी बी डब्ल्यू एम सी एम) या पदावर कार्यरत होते. आयुध निर्माणीमध्ये असलेल्या कामगारांच्या वसाहतीमध्येच ते कुटुंबीयांसह राहत होते. कंपनीमध्ये स्फोट होऊन त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती कळताच वसाहतीमध्ये शोककळा पसरली आहे. शवविच्छेदनानंतर त्यांचे पार्थिव कुटुंबीयांना सोपविले जाणार आहे.